पुणे : 15 दिवसांत 60 हजार मोफत बुस्टर | पुढारी

पुणे : 15 दिवसांत 60 हजार मोफत बुस्टर

पुणे : गेल्या 16 दिवसांमध्ये 60 हजार जणांनी मोफत बुस्टरचा लाभ घेतला आहे. एप्रिल महिन्यात केंद्र सरकारने मोफत बुस्टर डोसची घोषणा केली. शहरात खासगी रुग्णालयांमध्ये 18 ते 59 या वयोगटासाठी सशुल्क बुस्टर डोसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. त्या वेळी बुस्टर डोसला मिळणारा प्रतिसाद अल्प होता. 15 जुलैपासून मोफत बुस्टर डोस उपलब्ध करून देण्यात आल्यानंतर लाभार्थींची संख्या वाढली आहे. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 15 जुलैपासून 30 सप्टेंबरपर्यंत 18 ते 59 वर्षे वयोगटातील पात्र नागरिकांना सरकारी लसीकरण केंद्रांमध्ये बुस्टर डोस मोफत दिला जात आहे.

त्यापूर्वी सरकारी लसीकरण केंद्रांमध्ये केवळ 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, आरोग्य कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी यांना मोफत बुस्टर डोस उपलब्ध करून देण्यात आला होता. सध्या 18 वर्षांवरील नागरिकांना बुस्टर डोससाठी ऑनलाईन पद्धतीने किंवा प्रत्यक्ष लसीकरण केंद्रांवर जाऊन नोंदणी करता येत आहे. दररोज 3 हजार ते 6 हजार नागरिक मोफत लसीकरणाचा लाभ घेत आहेत. गेल्या 16 दिवसांमध्ये सर्वाधिक नागरिकांनी लाभ घेतल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

दुसरा डोस घेऊन 6 महिने किंवा 26 आठवडे पूर्ण झालेल्या 18 वर्षांवरील नागरिकांना कोव्हिशिल्ड किंवा कोव्हॅक्सिनचा तिसरा डोस घेता येणार आहे. नागरिकांनी महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रांमध्ये जाऊन प्राधान्याने लसीकरण करून घ्यावे.

               – डॉ. सूर्यकांत देवकर, लसीकरण अधिकारी, पुणे महापालिका

मोफत बुस्टर आकडेवारी
तारीख लसीकरण
15 जुलै 2828
16 जुलै 6340
17 जुलै 0
18 जुलै 5186
19 जुलै 4817
20 जुलै 4310
21 जुलै 4615
22 जुलै 5549
23 जुलै 7026
24 जुलै 213
25 जुलै 4593
26 जुलै 3371
27 जुलै 1201
28 जुलै 3087
29 जुलै 3082
30 जुलै 3668
31 जुलै 0

Back to top button