पुणे : निर्बंध उठविल्यामुळे मूर्तिकारांमध्ये उत्साह | पुढारी

पुणे : निर्बंध उठविल्यामुळे मूर्तिकारांमध्ये उत्साह

जेजुरी, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्राचा लोकप्रिय सण गणेशोत्सव महिन्यावर येऊन ठेपला आहे. यंदा महाराष्ट्र शासनाने उत्सवासंदर्भात निर्बंध हटविल्यामुळे गणेशमूर्तिकार आणि सार्वजनिक गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. गणेशोत्सव एका महिन्यावर आल्याने जेजुरीत गणेशमूर्तिकारांची मूर्तींच्या रंगरंगोटीसाठी लगबग सुरू झाली आहे.

जेजुरी शहर व पंचक्रोशीत दरवर्षी लहान बारा हजार मूर्ती, तर सार्वजनिक गणेश मंडळांसाठी अडीचशे मोठ्या गणेशमूर्तींची विक्री होत असते. जेजुरी शहरात यासाठी आठ ते नऊ गणेशमूर्ती विक्रीची दुकाने थाटली जातात. जेजुरी येथील गणेशमूर्तिकार तुषार कुंभार व सचिन कुंभार हे वर्षभर गणेशमूर्ती तयार करतात. या वर्षीच्या उत्सवासाठी त्यांनी एक हजार लहान मूर्ती तयार केल्या असून, सध्या रंगरंगोटीची लगबग सुरू आहे. या वर्षी घरात बसविण्यासाठी झोपळ्यावरील मूर्ती, बैलगाडी शर्यत, लालबाग, बालगणेश या मूर्तींना मोठी मागणी आहे.

कच्च्या मालावरील जीएसटीवाढीने मूर्ती महागणार

महाराष्ट्र शासनाने गणेशमूर्ती आणि उत्सवासाठी निर्बंध उठविले असले, तरी केंद्र शासनाने कच्च्या मालावर जीएसटीत वाढ केल्याने या वर्षी गणेशमूर्तीच्या किमतीत 20 टक्के वाढ होईल. तसेच, यापूर्वी पीओपीपासून मूर्ती तयार करण्यावर निर्बंध होते. त्यामुळे शाडूच्या मातीपासून मूर्ती तयार करण्यासाठी वेळ लागत होता. यंदा मात्र पीओपीपासून मूर्ती तयार करण्यास परवानगी दिल्याने मूर्तिकारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

शासनाने मूर्तीच्या उंचीवरील निर्बंध मागे घेतल्याने सार्वजनिक मंडळाकडून मोठ्या मूर्तींची मागणी होत आहे. आमच्याकडील मूर्तींची किंमत दोनशे रुपयांपासून सुमारे 21 हजार रुपयांपर्यंत आहे.

– तुषार कुंभार, मूर्तिकार, जेजुरी

Back to top button