पुणे : वरसगाव धरणात तरुणाचा बुडून मृत्यू.... | पुढारी

पुणे : वरसगाव धरणात तरुणाचा बुडून मृत्यू....

वेल्हे, पुढारी वृत्तसेवा : पानशेत-लवासा रोडवरील साईव बुद्रुक (ता. वेल्हे) गावच्या हद्दीतील वरसगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रात रविवारी (दि. 31) दुपारी बाराच्या सुमारास मासे पकडताना आदिवासी कातकरी समाजाच्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला. किरण विठ्ठल वाघमारे (वय 18, रा. साईव बुद्रुक) असे मृत तरुणाचे नाव आहे.

किरण हा मित्रासह मासे पकडण्यासाठी वरसगाव धरणावर आला होता. तो एकटाच धरणतीरावरील पाण्यात मासे पकडत होता. त्याचा मित्र तीरावर दूर अंतरावर थांबला होता. मासे पकडण्यासाठी किरण पाण्यात उतरल्यानंतर बेपत्ता झाला. त्याच्या मित्राने जोरदार आरडाओरडा केला. त्यानंतर साईव बुद्रुकचे सरपंच देविदास हनमघर यांनी तीरावर धाव घेतली. त्यांनी तातडीने वेल्हे पोलिसांना माहिती दिली.

वेल्हे पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक महेश कदम यांनी पोलिस पथकासह घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक मच्छीमार व मुळशी आपत्ती व्यवस्थापन समितीच्या सुरक्षा जवानांनी पाण्यात शोध घेतला. मात्र, बेपत्ता किरणचा शोध लागला नाही. अखेर दोन-अडीच तास खोल पाण्यातील खाचखळग्यांत शोध घेत रमेश महाडीक, अतुल भवर व नीलेश तारू यांनी त्याचा मृतदेह खोल पाण्यातून बाहेर काढला.
पोलिस उपनिरीक्षक महेश कदम, पी. एन. मोघे यांनी उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह सायंकाळी उशिरा वेल्हे येथील ग्रामीण रुग्णालयात नेला. वेल्हे पोलिस तपास करीत आहेत.

Back to top button