पुणे : ग्रा. पं. सदस्याकडून प्रहारच्या अध्यक्षाला धमकी | पुढारी

पुणे : ग्रा. पं. सदस्याकडून प्रहारच्या अध्यक्षाला धमकी

पुणे, पुढारी वृत्तसेवा : पळसदेव ग्रामपंचायतीत माहिती अधिकाराखाली माहिती का मागितली म्हणून येथील एका विद्यमान ग्रामपंचायत सदस्याने प्रहार संघटनेचे ज्येष्ठ नागरिक अध्यक्ष दादाराम शिंदे यांना जातीवाचक शिवीगाळ करून जिवे मारण्यासह अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून कायमचा आत बसविण्याची धमकी दिली आहे.

पळसदेव येथील दादाराम गोविंद शिंदे यांनी माहिती अधिकाराखाली येथील ग्रामपंचायत सदस्यांनी केलेल्या अतिक्रमणाची व त्यांनी आजपर्यंत लाटलेल्या घरकुल व इतर शासकीय योजनांची माहिती घेण्यासाठी शुक्रवारी (दि. 29) पळसदेव ग्रामपंचायतीत माहिती अधिकाराखाली अर्ज घेऊन गेले होते. त्या दिवशी ग्रामसभा असल्याने सर्व सदस्य, ग्रामसेवक, पोलिस पाटील, ग्रामस्थ उपस्थित होते. शिंदे यांनी ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे माहितीचा अधिकार देऊन पोच घेऊन खाली आले असता, ग्रामपंचायत सदस्य कैलास दिनकर भोसले हे ग्रामपंचायतीच्या दुसर्‍या मजल्यावरून धावतच खाली आले व आमच्या सदस्यांची कोणतीही माहिती मागायची नाही, असे म्हणत शिंदे यांना अतिशय घाणेरड्या शब्दांत जातीवाचक शिवीगाळ करून अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली.

याआधीही भोसले यांनी दोन दिवसांपूर्वी अशाच शिव्या देऊन अ‍ॅट्रॉसिटीची धमकी दिल्याने शिंदे यांनी 28 जुलै रोजी रीतसर तक्रार तहसीलदार इंदापूर, गटविकास अधिकारी, इंदापूर पोलिस स्टेशन यांच्याकडे केली होती. त्याचा व माहिती अधिकार मागितल्याचा राग मनात धरून कैलास भोसले यांनी दादाराम शिंदे यांना जिवे मारण्याची धमकी दिली आहे. शिंदे यांची एक वर्षापूर्वी अ‍ॅन्जिओग्राफी झाली असून, काल केलेल्या दमबाजीमुळे त्यांचा त्रास आणखी वाढला आहे. यामुळे शिंदे यांनी दिनांक 30 रोजी इंदापूर पोलिस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केल्याने भोसले यांच्यावर 504 /506 कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी वरील व्यक्तीला तत्काळ अटक न केल्यास 14 ऑगस्ट रोजी प्रहार संघटनेच्या वतीने कोणतेही निवेदन न देता तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

Back to top button