पुणे : आंबेगावच्या पूर्वेला चोर्‍या सुरूच | पुढारी

पुणे : आंबेगावच्या पूर्वेला चोर्‍या सुरूच

पारगाव, पुढारी वृत्तसेवा : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात भुरट्या चोरांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. नदीकिनारी असलेल्या शेतपंपांमधील तांब्यांच्या तारा, केबल यांच्या चोर्‍या सुरूच असताना चंदन चोरांनी डोके वर काढले आहे. वळतीनजीक तेल्याची वात परिसरात चंदनाची झाडे कापून चंदन चोरल्याचा प्रकार रविवारी (दि.31) सकाळी उघडकीस आला.

तालुक्याच्या पूर्व भागात घोड, मीना नदीपात्रात शेतकर्‍यांच्या शेतपंपांमधील तांब्यांच्या तारा, केबल वायरच्या चोर्‍या गेले अनेक दिवसांपासून सुरूच आहे. मागील आठवड्यात वळती-नागापूर येथील मीना नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्‍याचे जवळपास 90 ढापे चोरांनी लंपास केले होते. आता चंदनचोरांनी डोके वर काढले आहे. मागील काळात चंदनचोरांनी या परिसरात अक्षरश: धुमाकूळ घातला होता. परंतु, त्यानंतर चंदन चोर्‍या थांबल्या होत्या. आता पुन्हा चंदनचोरांच्या चोर्‍या सुरू झाल्याने शेतकर्‍यांमध्ये घबराट पसरली आहे.

परिसरात अनेक शेतकर्‍यांच्या बांधावर चंदनाची झाडे आहेत. तसेच घोड, मीना नदीकिनारीही चंदनाची झाडे आहेत. चोरांनी आता ही झाडे लक्ष्य केली आहेत. वळती गावानजीक तेल्याची वात परिसरात चंदनाची झाडे कापून त्यातील चंदन काढून नेल्याचा प्रकार घडला आहे. चंदनाचा इतर भाग तेथेच टाकून चोरटे फरार झाले आहेत. वनविभागाने चंदनचोरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी नागरिकांनी केली आहे.

Back to top button