पुणे : पारगावला चोरट्यांचा धुमाकूळ | पुढारी

पुणे : पारगावला चोरट्यांचा धुमाकूळ

नानगाव, पुढारी वृत्तसेवा : पारगाव सा.मा. (ता.दौंड) येथे रविवारी(दि.31) पहाटे चोरट्यांनी तीन ठिकाणी घरफोडी केली. यात दागिने, रोकड तसेच दुचाकी व मोबाइल चोरट्यांनी पळवून नेला. यवत पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक नारायण पवार यांनी घटनास्थळी भेट दिली.

पारगाव सा.मा. येथील रेणुकानगर हर्बल लाईन परिसरातील मीराबाई बबन ताकवणे या शेतातील घरी राहतात. रविवारी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश केला. मधल्या खोलीमध्ये झोपलेल्या मीराबाई यांना धाक दाखवत कपाटातील सोन्याचे दागिने व काही रोकड पळविली.

तळवाडी परिसरातील सूरज ईश्वर ताकवणे यांच्या मधल्या खोलीला कुलूप होते. घरातील लोक बाजूच्या दोन खोल्यांमध्ये झोपले होते. चोरट्यांनी दोन्ही बाजूंच्या खोल्यांना बाहेरून कडी लावली व मधल्या खोलीची कडी कटरने तोडून दोन मोबाईल, लहान मुलांच्या कानातील सोन्याचा दागिना लंपास केला. याच परिसरातील विकास सीताराम ताकवणे यांच्या घरासमोर उभी असलेली दुचाकी चोरट्यांनी पळवून नेली. एकाच दिवशी तीन ठिकाणी चोर्‍या झाल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पारगाव येथील बाजारपेठेचा विस्तार होत आहे. गावातील लोकसंख्या व बाहेरगावाहून येणार्‍या कुटुंबांची संख्यादेखील दिवसेंदिवस वाढत आहेत. शिरूर-सातारा मार्ग व वाघोली मार्ग येथून जात असल्याने सतत वर्दळ असते. मागील काळात देखील गावात वेगवेगळ्या ठिकाणी छोट्या मोठ्या चोर्‍या झाल्या आहेत. पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. ग्रामसुरक्षा दलाची स्थापना करून गावात गस्तीचे काम सुरू केल्यास होणार्‍या चोरींना आळा बसेल, असे पोलिस निरीक्षक नारायण पवार यांनी सांगितले.

Back to top button