पिंपरी ; दीड हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षेला ‘दांडी’ | पुढारी

पिंपरी ; दीड हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षेला ‘दांडी’

पिंपरी : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी रविवारी (दि. 31) शहरातील 80 केंद्रांवर शिष्यवृत्ती परीक्षा पार पडली. परीक्षेसाठी 11 हजार 372 विद्यार्थ्यांनी नोंद केली होती. प्रत्यक्षात त्यापैकी 9 हजार 688 विद्यार्थीच परीक्षेला बसले. 1 हजार 684 विद्यार्थ्यांनी परीक्षेला ‘दांडी’ मारली. पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षांसाठी 80 केंद्रांवर नियमित पटावरील एकूण 11 हजार 356 तर, अतिरिक्त 16 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. पाचवीच्या परीक्षेसाठी नोंद केलेल्या 7097 विद्यार्थ्यांपैकी 6 हजार 86 विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेला बसले होते. तर, 1 हजार 11 विद्यार्थी गैरहजर होते. आठवीच्या परीक्षेसाठी नोंद केलेल्या 4 हजार 275 विद्यार्थ्यांपैकी 3 हजार 602 विद्यार्थी परीक्षेला बसले. तर, 673 विद्यार्थी गैरहजर होते.

पाचवीची परीक्षा 49 केंद्रांवर तर, आठवीची परीक्षा 31 केंद्रांवर झाली. शिष्यवृत्तीची परीक्षा यापूर्वी 20 जुलैला घेण्याचे नियोजन होते. मात्र, राज्यातील विविध जिल्ह्यांत निर्माण झालेल्या पूरस्थितीने परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. दरम्यान, आज झालेल्या परीक्षेच्या नियोजनासाठी 80 केंद्र संचालकांच्या नियुक्त्या केलेल्या होत्या. 550 पर्यवेक्षकांकडे त्याची जबाबदारी सोपविली होती. त्याशिवाय, 150 शिपाई त्यासाठी नियुक्त करण्यात आले होते. परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी 8 फिरते तपासणी पथक नेमले होते. महापालिका शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी संजय नाईकडे, सहायक प्रशासन अधिकारी रजिया खान, पर्यवेक्षक अनिता जोशी, राजेंद्र कांगुडे, शिष्यवृत्ती परीक्षा समन्वयक सुभाष सूर्यवंशी यांनी या परीक्षांचे नियोजन केले.

कशी झाली परीक्षा
सकाळी 11 ते दुपारी 12.30 या वेळेत प्रथम भाषा व गणित यांची प्रश्नपत्रिका सोडवून घेण्यात आली. तर, दुपारी 1.30 ते 3 या वेळेत तृतीय भाषा व बुद्धीमत्ता चाचणी ही परीक्षा झाली. एकूण दोन प्रश्नपत्रिका होत्या. प्रत्येक प्रश्नपत्रिका 150 गुणांची होती. प्रश्नपत्रिकेत प्रत्येक प्रश्नाला 2 गुण होते.

विद्यार्थ्यांची गैरहजेरी कशामुळे वाढली
पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षांना यंदा दीड हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी गैरहजर राहिले. त्याच्या प्रमुख कारणांची माहिती घेतली असता, प्रामुख्याने जाणवलेले प्रबळ कारण म्हणजे शिष्यवृत्ती परीक्षा लांबल्याने विद्यार्थ्यांचा उत्साह कमी झाला होता. परगावी गेलेले विद्यार्थी, कोरोनामुळे स्थलांतरित झालेले विद्यार्थी त्याचाही परिणाम विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर झाला.

पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा 80 केंद्रांवर झाली. परीक्षा शांततेत पार पडली. विविध कारणांमुळे यंदा परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची उपस्थिती घटली.

                                    – अनिता जोशी, पर्यवेक्षिका, महापालिका शिक्षण विभाग

विद्यार्थ्यांची गेल्या रविवारी सराव परीक्षा घेण्यात आली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांचा सराव झालेला असल्याने त्यांना शिष्यवृत्ती परीक्षेचा ताण जाणवला नाही.

                                                                          – मंगेश देशमुख, शिक्षक

Back to top button