पिंपरी : राज्यपालांच्या मुखी भाजपचे बोल : शिवसेनेचे शहरप्रमुख अ‍ॅड. सचिन भोसले | पुढारी

पिंपरी : राज्यपालांच्या मुखी भाजपचे बोल : शिवसेनेचे शहरप्रमुख अ‍ॅड. सचिन भोसले

पिंपरी : राज्यपाल हे मोठे घटनात्मक पद आहे. मात्र, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना संधीचे सोने करता येत नाही. राज्यपालांच्या मुखी भाजपचे बोल आहेत, अशी टीका शिवसेनेचे शहरप्रमुख अ‍ॅड. सचिन भोसले यांनी येथे केली. राज्यपालांनी महाराष्ट्राचा इतिहास अभ्यासावा मगच बोलावे असा सल्लाही त्यांनी दिला आहे. मुंबई, ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी नागरिकांना बाहेर काढल्यास मुंबई देशाची आर्थिक राजधानी राहणार नाही आणि मुंबई महाराष्ट्राकडे पैसाच उरणार नाहीत, असे वक्तव्य राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी केले होते.

त्याच्या निषेधार्थ पिंपरी चिंचवड शहर शिवसेनेच्यावतीने रविवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आंदोलन करण्यात आले, या वेळी भोसले बोलत होते. आंदोलनात शहर महिला संघटिका उर्मिला काळभोर, सरिता साने, अनंत कोराळे, कल्पना शेटे, शैलेश मोरे यांसह अन्य पदाधिकारी सहभागी झाले होते. या वेळी भोसले म्हणाले, की राज्यपाल हे मोठे पद आहे. मात्र, राज्यपाल भगतसिंह कोशारी हे भाजपचे प्रवक्ते असल्यासारखे वागत आहेत. या वेळी शिवसैनिकांनी राज्यपाल कोशयारी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच, राज्यपालांना केंद्र सरकारने परत बोलून घेण्याची मागणी करण्यात आली.

 

Back to top button