हिमाचलमधील सफरचंदांचा पुण्यात गोडवा | पुढारी

हिमाचलमधील सफरचंदांचा पुण्यात गोडवा

पुणे; पुढारी वृत्तसेवा: हिमाचल प्रदेशातील सफरचंदाचा हंगाम सुरू झाल्याने मार्केट यार्डातील फळबाजारात सफरचंदाची आवक सुरू झाली आहे. सध्या परदेशीबरोबर देशी सफरचंदही बाजारात दाखल होत आहे. रविवारी येथील फळबाजारात 25 ते 30 किलोच्या 8 ते 10 हजार पेट्यांची आवक झाली. घाऊक बाजारात एका पेटीला 1800 ते 3000 रुपये भाव मिळाला. पावसाळा हा भारतीय सफरचंदाचा मुख्य हंगाम असतो. सध्या हिमाचल प्रदेशातून रॉयल हे सफरचंद मोठ्या प्रमाणात बाजारात दाखल होऊ लागले आहेत. त्यामुळे परदेशी सफरचंदाच्या दरात 25 ते 30 टक्क्यांनी घसरण झाली आहे.

सध्या किरकोळ बाजारात सफरचंदाची 200 ते 240 रुपये किलो दराने विक्री सुरू असल्याचे व्यापारी भरत पंजाबी यांनी सांगितले. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळबाजारात वॉशिंग्टन, अर्जेंटिना, चिली, इराण, इटली, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका येथून वर्षभर परदेशी सफरचंदाची आवक होत असल्याचे सांगून व्यापारी अरविंद मोरे म्हणाले, ‘शीतगृहात साठवणूक केलेली ही सफरचंदे मागणीनुसार बाजारात विक्रीसाठी आणली जातात. त्याचा वाहतूक खर्च आणि साठवणूक खर्च अधिक असल्याने त्यांचे किरकोळ बाजारात येईपर्यंतचे दर वाढतात. मात्र, भारतीय सफरचंद दोन ते तीन दिवसांनी थेट बाजारात येतात आणि त्यांचा वाहतूक खर्च या परदेशी सफरचंदांच्या मानाने कमी असल्याने बाजारात त्यांचे दरही कमी असतात. दिवाळीपर्यंत भारतीय सफरचंदांचा हंगाम सुरू राहणार आहे.’

Back to top button