ताथवडे : सांडपाण्यामुळे नदीच्या प्रदुषणात वाढ | पुढारी

ताथवडे : सांडपाण्यामुळे नदीच्या प्रदुषणात वाढ

ताथवडे : पुढारी वृत्तसेवा : काळेवाडी येथील पवना नदीपात्रात पूररेषेत बेकायदेशीर भराव टाकल्यामुळे व मैलामिश्रित सांडपाणी सोडले जात असल्यामुळे पवना नदीच्या प्रदूषणात वाढ होत आहे. काळेवाडी, बीआरटी रोडच्या लगत परिसरामध्ये नदीच्या पात्रात भराव टाकून अनधिकृत बांधकामे केली जात आहेत. त्यामुळे पर्यावरणाचा र्‍हास होत आहे. पवना नदीचे मूळ पात्र अरुंद होत असून पावसाळ्यामध्ये येणार्‍या पाण्यामुळे परिसरात पूरपरिस्थिती निर्माण होऊ शकते.

पवना नदीपात्रालगत पूररेषेमध्ये भराव टाकून काही व्यावसायिक अतिक्रमण करण्याचे प्रकार सर्रासपणे सुरू आहेत. पवना नदीपात्रात ठेकेदाराकडून काम सुरू असून, मैलामिश्रित सांडपाणी पंपाने उपसून पवना नदीमध्ये सोडले जात आहे. काही दिवसांपूर्वीच शहरातील इंद्रायणी आणि पवना या दोन्ही नद्यांचे प्रदूषण चिंताजनक असल्याचा अहवाल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने जाहीर केला होता. तरीही संबंधित यंत्रणांकडून नदी प्रदूषणच्या तक्रारींकडे कानाडोळा करण्यात येत आहे. त्यामुळे संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिद्धीक शेख यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशीक अधिकारी यांच्याकडे केली आहे.

Back to top button