मुळशीत पुन्हा आरक्षण सोडत होणार? | पुढारी

मुळशीत पुन्हा आरक्षण सोडत होणार?

हिंजवडी : मुळशी पंचायत समिती निवडणुकीचे आरक्षण पुन्हा काढण्याची नामुष्की प्रशासनावर येण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यातील अनुसूचित जाती महिलासाठी असलेले आरक्षण भुगाव गणात जाहीर करण्यात आले होते. मात्र, हे आरक्षण लोकसंख्येच्या आधारे दुसर्‍याच गटात देण्यात यावे याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष वेधले आहे. त्यामुळे फक्त भुगाव गणाची आरक्षण सोडत होणार? की तालुक्यातील सर्व जागांचे आरक्षण सोडत होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पौडला पंचायत समितीच्या सेनापती बापट सभागृहात तहसीलदार अभय चव्हाण यांनी गुरुवारी (दि.29 जुलै) आरक्षण सोडत जाहीर केली. या वेळी जिल्हा पुरवठा निरीक्षक सुरेखा माने, निवासी नायब तहसीलदार श्रीकांत मिसाळ, सरिता पाटील, गटविकास अधिकारी संदीप जठार आदी उपस्थित होते. अनुसूचित जाती महिला जागेची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे. अनुसूचित जातीची सर्वांधिक मते हिंजवडी गणात 2625 यासह भूगावमध्ये 2286 आणि माणमध्ये 2182 मतदार आहेत. वास्तविक आयोगाच्या सूचनेनुसार गणाच्या रचनेत पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त बदल झाल्यास त्याठिकाणी नव्याने आरक्षण टाकले जाते; पण बदलत्या गणरचनेत पन्नास टक्क्यांपेक्षा कमी बदल झाला असल्यास सन 2002 ते 2017 पर्यंतच्या निवडणुकीतील आरक्षणाचाही विचार केला गेला पाहिजे.

भूगाव या नव्याने झालेल्या गणातून बावधन हे गाव वगळले गेले. यासह हिंजवडी गणदेखील बदलला असून त्यातील म्हाळुंगे गाव पुणे महापालिकेत समाविष्ट करण्यात आले आहे. परंतु, भूगावची फेररचना करताना त्यात पन्नास टक्क्यांपेक्षा कमी बदल झाला आहे. यापूर्वी हा गण अनुसूचित जातीसाठी राखीव होता. त्यामुळे या गणात पुन्हा तेच आरक्षण पडू शकणार नाही. तहसीलदार चव्हाण यांनी जिल्हाधिकार्‍यांची भेट घेऊन आयोगाला याबाबत कळविले आहे. आयोगानेही ही बाब मान्य केली असून, येथे आयोगाकडून तारीख कळविल्यानंतर फेरआरक्षण करण्यात येईल, असे चव्हाण यांनी सांगितले.

दरम्यान शुक्रवारी दिवसभर याबाबत तालुक्यातील गावागावांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू होत्या. आता नव्याने आरक्षण कधी आणि कोणत्या जागांसाठी होणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यामुळे इच्छुक उमेदवार मात्र चिंतातुर झाले आहेत. याबाबत पुढील आदेश जिल्हाधिकारी देतील त्यानुसार कार्यवाही करण्यात येईल, असे तहसीलदार चव्हाण
यांनी सांगितले.

Back to top button