लोणी-धामणी-शिरदाळेतील पाणी प्रश्न मिटला | पुढारी

लोणी-धामणी-शिरदाळेतील पाणी प्रश्न मिटला

लोणी-धामणी; पुढारी वृत्तसेवा: आंबेगाव तालुक्यातील दुष्काळी भाग म्हणून ओळख असलेला लोणी, धामणी, शिरदाळे, पहाडदरा परिसर यंदा भरघोस पावसाने भिजून गेला आहे. गुरुवारी (दि. 29) रात्री उशिरा झालेल्या मुसळधार पावसाने ओढ्या-नाल्यांना पूर आले आहेत. तब्बल पाच वर्षांच्या कालावधीनंतर या परिसरात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. लोणी परिसरात देखील उच्चांकी पाऊस झाला असून, पाण्याचा प्रश्न मिटला आहे. धामणी परिसरातदेखील अशीच स्थिती असून ओढ्यांना आलेल्या पुराने पाणी समस्या जरी मिटली असली तरी शेतीचे नुकसान होणार आहे.

परंतु उन्हाळ्यात होणारी पाणीटंचाई यावर्षी कमी असेल असे आनंदा जाधव, संदीप बोऱ्हाडे, प्रतीक जाधव यांनी सांगितले. शिरदाळे परिसरातदेखील कमी लागवड झालेले बटाटा क्षेत्र, त्यात अतिपाऊस यामुळे पहिल्यापासून संकटात अडकलेला शेतकरी अजून संकटात जाऊ शकतो. मोठं भागभांडवल असलेले बटाटा पिकाची यंदा फक्त 50 टक्के लागवड झाली आहे. त्यात अतिपाऊस यामुळे 10 ते 15 टक्के क्षेत्र पाण्यात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी संकटात येण्याची भीती माजी सरपंच मनोज तांबे, गणेश तांबे यांनी व्यक्त केली.

पावसामुळे पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करा
या पावसाने शेतीपिकांचे नुकसान होणार असून, कृषी विभागाने त्वरित पंचनामा करावा, अशी मागणी अशोक आदक पाटील व बाळशिराम वाळुंज यांनी केली आहे. यासह पहाडदरा परिसरात बाजरी पिकाचे मोठे नुकसान होणार असून, संबंधित विभागाने त्वरित पंचनामा करून शेतकर्‍यांची दखल घ्यावी, अशी मागणी संतोष कुरकुटे व गुलाब वाघ यांनी केली.

दरवर्षीच्या तुलनेत या वर्षी पावसाचे प्रमाण खूप जास्त आहे. सरासरीपेक्षा पडलेला जास्त पाऊस भविष्यासाठी जरी फायद्याचा असला तरी पिकांचे मोठे नुकसान होणार आहे. पावसाचा जोर असाच राहिला तर बटाटा, वाटाणा, बाजरी, सोयाबीन ही महत्त्वाची पिके 100 टक्के जाऊ शकतात. ओढे, नाले तब्बल पाच वर्षांनंतर तुडुंब झाले आहेत, याचे समाधान देखील आमच्या शेतकर्‍यांच्या चेहर्‍यावर दिसत आहे.
 

                                                – मयूर सरडे, उपसरपंच, शिरदाळे

Back to top button