पुणे : सर्रास तपासणीची गरज नाही; आरोग्य विभागाच्या स्वाइन फ्लूबाबत सूचना | पुढारी

पुणे : सर्रास तपासणीची गरज नाही; आरोग्य विभागाच्या स्वाइन फ्लूबाबत सूचना

पुणे : सध्या स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. तसेच, अनेकांमध्ये सामान्य फ्लूचे निदान होत आहे. स्वाइन फ्लूच्या तपासणीसाठी 1200 ते 1300 रुपये मोजावे लागतात. त्यामुळे सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांनी सर्रास तपासणी करण्याची गरज नाही, असे आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले आहे. नवीन आदेशानुसार स्वाइन फ्लूच्या लक्षणांची अ, ब आणि क अशी वर्गवारी करण्यात आली आहे. त्यातील ‘सी’ अर्थात ‘क’ प्रकारातील लक्षणे आढळून येत असतील तरच तपासणी करावी, असे नमूद करण्यात आले आहे. महापालिका आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती आणि सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे यांच्या स्वाक्षरीने हा आदेश काढण्यात आला आहे.

‘अ’ वर्गामध्ये थोडा ताप, कफ, घसा खवखणे, अंगदुखी, डोकेदुखी, जुलाब, उलटी अशा लक्षणांचा समावेश आहे. अशा परिस्थितीत तपासणीची घाई न करता रुग्णाचे घरीच विलगीकरण करणे, योग्य औषधोपचार आणि 24 तास देखरेखीखाली ठेवणे या उपायांचा समावेश करण्यात आला आहे. ‘ब’ वर्गामध्ये तीव्र जास्त ताप, घशामध्ये संसर्ग आणि नाक गळत असेल आणि लक्षणे तीव्र असतील तरच प्रयोगशाळा तपासणी करून घेणे आवश्यक आहे. अन्यथा रुग्णाला घरीच विलगीकरणात ठेवणे आणि औषधे देणे हा उपाय यामध्ये सांगितला आहे. ‘क’ वर्गात श्वास घेण्यास अडचण, छातीत दुखणे, हायपर टेन्शन, नखे दुखणे यांसारखी लक्षणे असतील तर त्यांचे नमुने प्रयोगशाळा तपासणीसाठी पाठवणे आवश्यक आहे. गरज पडल्यास रुग्णाला रुग्णालयात दाखल करणे आवश्यक आहे, असे नमूद करण्यात आले आहे.

‘हाय रिस्क’मधील रुग्णांची तपासणी आवश्यक
गर्भवती महिला, पाच वर्षांखालील मुले आणि 65 वर्षांवरील वृद्ध, सहव्याधी असलेल्या व्यक्ती, केमोथेरपी सुरू असलेल्या आणि प्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्ती यांच्यात लक्षणे आढळल्यास विशेष काळजी घेऊन त्यांची प्रयोगशाळा तपासणी करणे आवश्यक असल्याचे या आदेशात म्हटले आहे.

 

Back to top button