पुणे : बारामतीतून सर्वसाधारण पुरुषाला संधी नाही | पुढारी

पुणे : बारामतीतून सर्वसाधारण पुरुषाला संधी नाही

बारामती, पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषदेच्या राजकारणात नेहमी महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या बारामती तालुक्यात यंदा एकाही सर्वसाधारण पुरुषाला संधी मिळणार नसल्याचे गुरुवारी (दि. 28) झालेल्या आरक्षण सोडतीत स्पष्ट झाले आहे. तालुक्यात फक्त मोरगाव-मुढाळे गटात सर्वसाधारण गटातील महिलेला संधी मिळणार आहे. तालुक्यात अनुसूचित जातीसाठी तीन गट आरक्षित झाले असून, त्यात दोन जागी महिलांना संधी मिळणार आहे.

जिल्हा परिषद निवडणुकीत मनासारखे आरक्षण पडावे, यासाठी बारामती तालुक्यात अनेक दिग्गजांनी देव पाण्यात ठेवले होते. या आरक्षणाने त्यांची घोर निराशा झाली. तालुक्यात सर्वसाधारण प्रवर्गाची लोकसंख्या सर्वाधिक आहे. परंतु, या प्रवर्गातील एकाही पुरुषाला यंदा जिल्हा परिषदेवर प्रतिनिधीत्वाची संधी मिळणार नाही. तालुक्यातील सात गटांपैकी फक्त मोरगाव-मुढाळे या एकाच गटात सर्वसाधारण महिलेला संधी मिळणार आहे.

कार्‍हाटी-सुपा हा गट नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित झाला आहे. काटेवाडी- शिर्सूफळमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग हे आरक्षण आहे. गुणवडी-पणदरे गटात अनुसूचित जातीच्या महिलेला संधी मिळेल. निंबुत-वाघळवाडी गटात नागरिकांचा मागास प्रवर्ग हे आरक्षण आहे. वडगाव निंबाळकर-सांगवी गट अनुसूचित जातीसाठी तर निरावागज-डोर्लेवाडी हा गट अनुसूचित जातीच्या महिलेसाठी आरक्षित झाला आहे.

वडगाव-सांगवी या गटाची यंदा पुनर्ररचना झाली होती. सर्वसाधारण गटातील अनेक इच्छुक होते. परंतु गट अनुसूचित जातीसाठी राखीव झाला. तीच गत निरावागज-डोर्लेवाडी व गुणवडी-पणदरे या गटांबाबत झाली आहे. तेथे अनुसूचित जातीच्या महिलेला संधी मिळेल. सुपा-कार्‍हाटी गटातून सर्वसाधारण प्रवर्गातील दिग्गजांमध्ये जोरदार फाईट होईल अशी अटकळ बांधली जात होती. परंतु हा गट ओबीसी महिलेसाठी आरक्षित झाला आहे. निंबूत-वाघळवाडी व काटेवाडी-शिर्सूपळ गटात हीच स्थिती निर्माण झाली आहे. एकूणच तालुक्यातील सातपैकी फक्त एकच गट सर्वसाधारण गटासाठी आणि तो ही महिलेसाठी आरक्षित झाल्याने सर्वसाधारण प्रवर्गातील इच्छुकांचा मोठा हिरमोड झाला. दुसरीकडे अनुसूचित जाती व इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांना यानिमित्ताने संधी मिळाल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला.

Back to top button