पिंपरी : महावितरणने थांबविला ‘स्मार्ट व्हीएमडी’चा वीजपुरवठा  | पुढारी

पिंपरी : महावितरणने थांबविला ‘स्मार्ट व्हीएमडी’चा वीजपुरवठा 

मिलिंद कांबळे : 

पिंपरी : पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीच्यावतीने शहरातील विविध ठिकाणच्या 55 व्हेरीबेल मेसेजिंग डिस्प्लेचे (व्हीएमडी) 70 लाखांपेक्षा अधिकचे वीज बिल थकले होते.  ठेकेदार की स्मार्ट सिटी बिल भरणार या वादात बिल भरणे रखडल्याने महावितरणने वीजपुरवठा खंडित करण्याची नोटीस दिली होती. अखेर, ठेकेदारांसमोर नमते घेत स्मार्ट सिटी कंपनीने नाईलाजास्तव स्वत: बिल भरून आपली मानहानी झाकण्याचा प्रयत्न केला.

स्मार्ट सिटीच्या पॅन सिटी प्रकल्पामध्ये शहरात 55 ठिकाणी व्हीएमडी उभारण्यात आले आहेत. त्यावर स्मार्ट सिटी, महापालिका, पोलिस विभागाचे जनजागृतीवर संदेश तसेच, खासगी जाहिराती प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. व्हीएमडीला अद्याप इंटरनेटचा जोड देण्यात आलेला नाही. मात्र, पेनड्राईव्हच्या माध्यमातून त्यावर पालिकेच्या जाहिराती झळकत होत्या. त्यात कोरोना, पाणीपुरवठा, क्रीडा स्पर्धा, विविध उपक्रमांच्या जाहिरातीचा समावेश होता.

विविध ठेकेदार एजन्सीमध्ये समन्वय नसल्याने व्हीएमडी पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होण्यास विलंब होत आहे. त्यामुळे जाहिरातीच्या माध्यमातून मिळणारे स्मार्ट सिटीचे कोट्यवधींचे उत्पन्न बुडत आहे. या व्हीएमडीसाठी वीजजोड घेण्यात आला आहे. काम दोन वर्षांपेक्षा अधिक काळ रेंगाळले आहे. विजेचे बिल तब्बल 70 लाखांपर्यंत जाऊन पोहोचले. काम पूर्ण होईपर्यंत व्हीएमडीच्या वीजपुरवठ्याचे बिल संबंधित ठेकेदार एजन्सीने द्यावे, अशी भूमिका स्मार्ट सिटीने घेतली. काम पूर्ण होण्यापूर्वीच भरमसाट बिल आल्याने ठेकेदाराने बिल भरण्यास नकार दिला. या वादात वीज बिलाची थकीत बिल भरले गेले नाही. मुदतीमध्ये बिल भरले जात नसल्याने महावितरणने व्हीएमडीचा वीजपुरवठा खंडित करण्याची नोटीस बजावली. त्याबाबतची कारवाई सुरू केली.

‘स्मार्ट सिटीच्या कामास नाही ‘स्पीड’; कोट्यवधी खर्च करून व्हीएमडी धूळखात’  या शीर्षकाखाली ‘पुढारी’ने 1 जुलैला ठळक वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत स्मार्ट सिटीच्या अधिकार्‍यांनी संबंधित ठेकेदाराचे प्रतिनिधी आणि सल्लागारांसोबत बैठक घेऊन त्यांना तातडीने काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले. त्या बैठकीत थकीत वीज बिलाचा प्रश्न समोर आला. अखेर, स्मार्ट सिटीने नमते घेत 70 लाखांपेक्षा अधिकचे थकीत बिल व मीटर पुर्नजोडचे महावितरणचे शुल्क स्वत: अदा केले. फायबर केबल नेटवर्किंगने व्हीएमडी जोडल्यानंतर वीजपुरवठा पुन्हा सुरू केला  जाणार आहे.

थकीत वीज बिल स्मार्ट सिटीने भरले

प्रायोगिक तत्वावर शहरात काही व्हीएमडी सुरू करण्यात आल्या होत्या. त्यावर महापालिकेच्या जाहिराती प्रसिद्ध केल्या जात होत्या. नियम व अटी तपासून व्हीएमडीचे थकीत वीज बिल स्मार्ट सिटी कंपनीने भरले आहे. सर्व व्हीएमडी लवकरच पूर्ण क्षमतेने कार्यान्वित केले जाणार आहे. त्याचा लाभ शहरवासीयांना होणार आहे, असे स्मार्ट सिटीचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव यांनी सांगितले.

Back to top button