पुणे : सिंहगड पायथा रस्त्याची दुरवस्था | पुढारी

पुणे : सिंहगड पायथा रस्त्याची दुरवस्था

वेल्हे, पुढारी वृत्तसेवा : सिंहगड किल्ल्याच्या शिवकालीन पायी मार्गापेक्षा गड पायथ्याच्या गोळेवाडी ते आतकरवाडी (ता. हवेली) रस्त्याचा प्रवास खडतर बनला आहे. आतकरवाडी रस्त्याची खड्डे पडून अक्षरश: चाळण झाली आहे. पावसाचे पाणी साठून खड्डे पडले आहेत. त्यामुळे हजारो पर्यटकांसह स्थानिक रहिवाशांना हलाखीला तोंड द्यावे लागत आहे. खड्ड्यात वाहने घसरून अपघात होतात. असे असतानाही जिल्हा परिषद प्रशासनाने रस्त्याकडे दुर्लक्ष केले आहे.

गडावर जाणार्‍या शिवकालीन पायी मार्गाने रिमझिम पावसात ज्येष्ठ नागरिक, महिला, मुले सहज चढाई करत आहेत. मात्र, डोणजे येथील गोळेवाडी चौक ते आतकरवाडी रस्त्यावरून सिंहगडाच्या पायथ्याशी जाण्यासाठी मोठ्या खडतर प्रवासाला तोंड द्यावे लागत आहे. खड्डे चुकवण्यासाठीही चांगला रस्ता नाही, इतकी दुर्दशा झाली आहे.

अतिवृष्टीच्या पुरात लक्ष्मीआई ओढ्याच्या पुराच्या पाण्यात पुलासह रस्ता बुडाला होता. त्यामुळे काही काळ शेकडो पर्यटक अडकून पडले होते. सध्या पावसाचा जोर कमी झाला असला तरी पावसाचे पाणी साठून पुन्हा मोठमोठे खड्डे पडले आहेत.

रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, यासाठी जिल्हा परिषदेचे प्रशासक, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन देण्यात आले आहे. पूर निधीतून रस्त्याचे काम करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.

                                                          – नवनाथ पारगे, माजी जिल्हा परिषद सदस्य

पावसाळ्यापूर्वी आतकरवाडी रस्त्याची दुरुस्ती करण्याची विनंती करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केले. आता अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे खड्डे पडून रस्त्याची चाळण झाली आहे. गडावर पायी जाणारे पर्यटक मोठ्या संख्येने या मार्गाने जातात. रस्त्याच्या दुर्दशेमुळे स्थानिक हॉटेल व्यावसायिक, दुकानदार, विद्यार्थी, कामगारही त्रस्त झाले आहेत.

                                                                          – गुलाबराव जेधे, माजी सरपंच

Back to top button