पुणे : घनकचरा प्रकल्प 15 ऑगस्टपर्यंत करा | पुढारी

पुणे : घनकचरा प्रकल्प 15 ऑगस्टपर्यंत करा

पुणे, पुढारी वृत्तसेवा : घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प वेळेत पूर्ण न करणार्‍या 311 गावांमधील सरपंच, ग्रामसेवकांना जिल्हा परिषदेने नोटिसा दिल्या आहेत. या नोटिसांव्दारे उर्वरित कामे 15 ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. काम अपूर्ण राहिल्याबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून तातडीने प्रकल्प पूर्ण करण्यास सांगितले आहे. कामे अपूर्ण ठेवण्यात बारामती तालुक्यातील गावे आघाडीवर आहेत.

ग्रामीण भागात कचर्‍याची समस्या मोठी असल्याने आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. गावात उघड्यावर कचरा टाकल्याने दुर्गंधी पसरते, कचर्‍याचे ढिगारे आजारांसाठी निमंत्रण ठरतात. हा कचर्‍याचा प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने पुढाकार घेतला. घनकचरा प्रकल्प सुरू करण्यासाठी गावोगावी जनजागृती केली. जिल्ह्यातील 1 हजार 328 घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. त्यापैकी 421 प्रकल्प पूर्ण झाले आहेत. अद्याप 311 ठिकाणी कामे सुरू असून, अद्याप ती अपूर्ण आहेत. हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी नोटिसा देण्यात आल्या आहेत. जोपर्यंत घनकचरा प्रकल्प पूर्ण करीत नाहीत तोवर हागणदारी मुक्त गाव(ओडीएफ प्लस) घोषित करण्यात येणार नसल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाकडून बजावण्यात आले आहे.

…हे करणे आवश्यक

गावांमध्ये कचर्‍याची समस्या दूर करण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत सर्व कुटुंबांना डस्टबिन वाटप, कचरा वाहून नेण्यासाठी वाहतूक व्यवस्था, कचरा वर्गीकरण (ओला व सुका), प्रक्रिया प्रकल्प बांधकाम (खतखड्डे), काच व प्लॅस्टिक युनिट, गावातील भिंतीचे रंगकाम व सुविचार या बाबी पूर्ण करणे आवश्यक आहे.

सात कोटी रुपयांचा निधीही दिला आहे

जून 2021 मध्ये कामांना सुरुवात झाली. ग्रामपंचायतीअंतर्गत महसुली गावांची 2021-22 मध्ये घनकचरा प्रकल्पाची अंदाजपत्रके तयार करून तांत्रिक व प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्याचबरोबर मागणी केल्यानुसार तालुकास्तरावर स्वच्छ भारत मिशन टप्पा 2 अंतर्गत अनुदानही ग्रामपंचातीला उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यासाठी जिल्हास्तरावरून 7 कोटी 30 लाख रुपयांच्या निधीचे वितरण मागणीनुसार करण्यात आल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाने म्हटले आहे.

सर्वांत कमी कामे बारामतीत

जिल्ह्यामधील कामांचा अहवाल पाणी व स्वच्छता विभागाने तयार केला आहे. घनप्रकल्पाचे सर्वांत कमी काम हे बारामती तालुक्यात झाले आहे. या तालुक्यात केवळ 9 टक्के कामे पूर्ण झाली आहेत. तर, सर्वाधिक कामे ही आंबेगाव तालुक्यात (80 टक्के) पूर्ण झाली आहेत. जुन्नरमध्ये 73 टक्के, मुळशीमध्ये 53 टक्के, मावळमध्ये 37 टक्के कामे पूर्ण झाली आहेत. सर्वाधिक प्रकल्प हे भोर तालुक्यात असून, 192 कामांना मंजुरी देण्यात आली. त्यापैकी 31 कामे पूर्ण झाली, तर 39 अपूर्ण असून, 122 कामे अद्याप सुरूच झालेली नाहीत.

Back to top button