पिंपरी : 39 जणांना मिळाले ट्रान्सजेंडर सर्टिफिकेट | पुढारी

पिंपरी : 39 जणांना मिळाले ट्रान्सजेंडर सर्टिफिकेट

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा:  पिंपरी-चिंचवड शहरामधून गेल्या दोन महिन्यांमध्ये एकूण 39 तृतीय पंथीयांना समाज कल्याण विभागाच्या वतीने ट्रान्सजेंडर प्रमाणपत्र दिल्याची माहिती विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. समाजातील उपेक्षित घटक आपल्या हक्कांसाठी जागरूक होताना दिसत आहे. शहराच्या एकूण 27 लाख लोकसंख्येमागे किमान पाच ते साडेपाच हजार तृतीयपंथीय आहेत, अशी माहिती शहरातील तृतीय पंथीयांसाठी काम करणार्‍या संस्थांनी दिली आहे; मात्र शहरात अद्यापपर्यंत समाज कल्याण विभागातून काही तृतीय पंथीयांनी ट्रान्सजेंडर प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज केले होते.

मात्र पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार 30 मार्च रोजी ‘आंतरराष्ट्रीय तृतीय पंथीय दिवस’ साजरा केला. यानंतर तृतीय पंथीयांना महापालिका सेवेत रूजू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सुरक्षारक्षक, ग्रीन मार्शल, सफाई कामगार व उद्यान कर्मचारी आदी पदांवर एकूण 27 तृतीय पंथीयांना रोजगार दिला गेला. याच आशेने शहरातील उपेक्षित असलेला तृतीय पंथीय घटक आपले प्रमाणपत्र काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

सर्टिफिकेट काढण्याची प्रक्रिया : 
प्रथम तृतीयपंथीयांना वकिलांकडून प्रतिज्ञापत्र बनवून घ्यावे लागते. यानंतर आधार, पॅन कार्ड व प्रतिज्ञापत्र हि तीनही कागद पत्रे एनपीटीपी(नॅशनल पोर्टल फॉर ट्रान्सजेंडर पर्सन्स) च्या साईडवर अपलोड करावी लागतात. कागद पत्राची छाननी होऊन समाज कल्याण विभागाच्या वतीने सर्टिफिकेट देण्यात येतात.

ट्रान्सजेंडर सर्टिफिकेटची संख्या

पिंपरी-चिंचवड 39

पुणे 208

वाटप सर्टिफिकेट 247

एकूण अर्ज
289

 

शहरातील तृतीय पंथीयांची आकडेवारी असणे आवश्यक आहे. त्यानुसार त्यांना शासनाची मदत पोहोचण्यास मदत मिळणार आहे. त्यामुळे तृतीयपंथीयांनी ट्रान्सजेंडर प्रमाणपत्र काढणे आवश्यक बाब बनली आहे. ज्यामुळे शासन दरबारी त्यांची नोंद राहील.
– राजेश पाटील, पिं. चिं. महापालिका आयुक्त.

मी गेल्या दोन महिन्यांपूर्वीच ट्रान्सजेंडर प्रमाणपत्र काढले आहे. यापूर्वी आमच्यापैकी कुणीही अर्ज केला नव्हता. मात्र महापालिकेने दिलेल्या रोजगारासाठी प्रमाणपत्राची आवश्यकता होती. म्हणूनच मी अर्ज केला होता.
– रूपा, तृतीयपंथी, पिं. चिं. शहर.

Back to top button