मांजरी परिसरात सापडला जुना बॉम्ब | पुढारी

मांजरी परिसरात सापडला जुना बॉम्ब

पुणे : पुढारी वृत्तसेवा : मांजरीतील अण्णासाहेब मगर विद्यालयाच्या जवळील परिसरात मंगळवारी सकाळी जुना बॉम्ब (हॅण्ड ग्रेनेड) सापडला. नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर बाँबशोधक नाशक पथकाने (बीडीडीएस) घटनास्थळी धाव घेऊन तातडीने बाँब सुरक्षित बाजूला काढून ताब्यात घेतला.  बॉम्ब आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती.

मात्र बीडीडीएसच्या पथकाने पाहणी केल्यानंतर तो धोकादायक नसल्याचे समोर आले आणि नाकरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.
मांजरीतील अण्णासाहेब मगर विद्यालयाच्या परिसरात बाँबसदृश वस्तू सापडल्याची माहिती पोलिस पाटील अंकुश उंद्रे यांनी पोलिसांना कळविली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्वरित पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त रोहिदास पवार, लोणीकंद पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन पवार यांनी घटनास्थळी भेट दिली. पथकाने बाँबची तपासणी केली असता तो जुना असल्याचे आढळून आले. ‘परिसरात आठ वर्षांपूर्वी भराव टाकण्यात आला होता. त्यात जुना बाँब दबलेला होता. पावसामुळे भरावातील माती बाहेर आली. मातीखाली दबलेल्या बाँबवरची माती कमी झाल्याने तो आढळून आला. बाँब ब्रिटिशकालीन असल्याची शक्यता असून तपासणीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतला आहे,’ अशी माहिती बीडीडीएसचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ढगे यांनी दिली.

Back to top button