पुणे : ‘ब्रॉयलर’चे दर घसरले | पुढारी

पुणे : ‘ब्रॉयलर’चे दर घसरले

मंचर, पुढारी वृत्तसेवा : आषाढ महिना पोल्ट्री व्यावसायिकांना आर्थिक धक्का देणारा, तर चिकन खवय्यांना मस्त जात आहे. अवघ्या 100 ते 125 रुपये प्रतिकिलो दराने चिकन खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. ब्रॉयलर कोंबडीच्या लिफ्टिंग दरामध्ये मोठ्या प्रमाणावर घसरण झाल्याने गेल्या दोन महिन्यापूर्वी 240 रुपये किलो दराने मिळणारे चिकन 100 ते 125 रुपये किलो दराने मिळत आहे.

चिकनचे बाजारभाव गडगडल्याने ऐन आषाढ महिन्यात ग्राहकांची मांसाहार खाण्याची चंगळ सुरू आहे. ब्रॉयलर कोंबडीचे दर अजूनही खाली उतरण्याची शक्यता घाऊक बाजारामध्ये वर्तविण्यात येत आहे. बाजारात मोठ्या प्रमाणात ब्रॉयलर कोंबड्यांच्या मालाची आवक झाली आहे.

अंड्यांच्या बाजारभावामध्येही शेकडा 150 रुपयांपर्यंत घसरण झाली आहे. घाऊक बाजारात किरकोळ 5.50 ते 6 रुपये दराने अंड्यांची विक्री होत आहे. अंड्यांच्या बाजारात कोलकता आणि हैदराबाद येथील मालाची उपलब्धता होत असल्याने अंडी आणि चिकन खवय्यांना स्वस्त दरात उपलब्ध झाले आहे.

आषाढातील खाण्याच्या दिवशी उपवास

आषाढ महिन्यात मोठ्या प्रमाणात चिकन फस्त केले जाते. त्यादृष्टीने पोल्ट्रीचालक आणि फार्मिंग कंपन्यांनी ब—ॉयलर पक्ष्यांचे मोठ्या प्रमाणात संगोपन केले. परंतु, या वेळी आषाढ महिन्यात रविवारी (दि. 3) विनायक चतुर्थी, पुढच्या रविवारी (दि. 10) एकादशी, बुधवारी (दि. 13) गुरुपौर्णिमा, शनिवारी (दि. 16) संकष्ट चतुर्थी आणि पुन्हा रविवारी (दि. 24) एकादशी, हे उपवासाचे दिवस असल्यामुळे या दिवशी हिंदू धर्मशास्त्रानुसार मांसाहार वर्ज्य असल्याने चिकनला उठाव नसल्यामुळे बाजारभाव गडगडले.

गावरानला मात्र मोठी मागणी, दरही चढे

आषाढ महिना संपत आला असून, गावरान कोंबडी आणि गावरान कोंबड्यांना मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे. त्यांच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. गावरान कोंबडा सहाशे ते सातशे रुपयांना आणि गावरान कोंबडी साडेचारशे ते पाचशे रुपये दराने विकली जात आहे.

Back to top button