वेल्हे : सिंहगडावर पर्यटकांची उच्चांकी गर्दी | पुढारी

वेल्हे : सिंहगडावर पर्यटकांची उच्चांकी गर्दी

वेल्हे; पुढारी वृत्तसेवा: सिंहगड किल्ल्यावर रिमझिम पाऊस, दाट धुक्यात रविवारी (दि. 24) हजारो पर्यटकांनी गर्दी केली होती. दिवसभरात पर्यटकांकडून दीड लाख रुपयांचा टोल वन विभागाने वसूल केला. खडकवासला धरण, पानशेत धरण परिसरात पर्यटकांनी गर्दी केली होती. खडकवासला चौपाटीच्या दोन्ही बाजूला पुणे-पानशेत रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. सिंहगडावर दिवसभरात पर्यटकांची चारचाकी 543 व दुचाकी 1914 वाहने गेली. त्यांच्याकडून वन खात्याने दीड लाख रुपयांचा टोल वसूल केला. पर्यटकांची संख्या सकाळी दहा वाजल्यापासून वाढली, त्यामुळे सिंहगडाच्या घाटरस्त्यावरील वाहतूक कोलमडून पडली.

वन विभागाचे वनपरिमंडलाधिकारी बाबासाहेब लटके, वनरक्षक बाळासाहेब जिवडे, सुरक्षारक्षक नितीन गोळे, रमेश खामकर यांच्यासह सुरक्षारक्षक वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी धावपळ करीत होते. तब्बल आठ ते दहावेळा घाटरस्ता बंद करावा लागला. रिमझिम पावसात तरुणाईबरोबर ज्येष्ठ नागरिक, महिला, मुलांच्या गर्दीने नरवीर तानाजी मालुसरे समाधी परिसरासह प्रवेशद्वार, पायर्‍या, पाऊलवाटा मार्ग बहरून गेले होते.

कांदाभजी, कणसे, झुणका-भाकरीचा आस्वाद घेत अनेक जण चिंब भिजण्याचा आनंद घेत होते. आतकरवाडी तसेच इतर पायी रस्त्यानेही शेकडो जण गडावर चालत गेले. वनपरिमंडलाधिकारी बाबासाहेब लटके म्हणाले की, घाटरस्त्यावर दरडीचा कोसळण्याचा धोका असल्याने पर्यटकांच्या सुरक्षेसाठी ठिकठिकाणी सूचनाफलक लावण्यात आले आहेत. सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत.

वाहतूक कोंडीने नागरिकांचे हाल
पुणे-पानशेत रस्त्यावरील वाहतूक दर शनिवार-रविवार पर्यटकांच्या विक्रमी गर्दीने कोलमडून आहे. हवेली पोलिस, सुरक्षारक्षक तैनात असूनही खडकवासला धरण माथ्यापासून गोर्‍हे, डीआयटीपर्यंत वाहनांच्या रांगा लागत आहेत. वाहतूक कोंडीमुळे आज दुपारपासून स्थानिक नागरिकांसह पर्यटकांचे हाल झाले.

Back to top button