पुणे : अंतिम मतदार यादीची प्रतीक्षाच; संकेतस्थळावर 27 प्रभागांची अद्याप यादी जाहीर होईना | पुढारी

पुणे : अंतिम मतदार यादीची प्रतीक्षाच; संकेतस्थळावर 27 प्रभागांची अद्याप यादी जाहीर होईना

पुणे; पुढारी वृत्तसेवा: आगामी महापालिका निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या अंतिम मतदार यादीतील तब्बल 27 प्रभागांची मतदार यादी महापालिकेच्या संकेतस्थळावर जाहीर होऊ शकलेली नाही. या मतदार याद्या संकेतस्थळावर अपलोड होण्यासाठी वेळ लागत असल्याने या प्रभागांच्या नावापुढे ‘कमिंग सून’ अर्थात ‘लवकर येईल’ असा मेसेज येत आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार महापालिका प्रशासनाने प्रारूप मतदार यादी तयार करून ती जाहीर केली होती. त्यावर हरकती-सूचना मागविण्यात आल्या होत्या. मात्र, या मतदार यादीत प्रचंड प्रमाणात त्रुटी असल्याच्या तक्रारी सर्वच राजकीय पक्षांकडून करण्यात आल्या होत्या.

त्यात प्रामुख्याने अनेक प्रभागांत मतदारांच्या नावांत गोंधळ असल्याचे आढळून आले होते. त्यामुळे या दुरुस्तीसाठी पालिका प्रशासनाने निवडणूक आयोगाकडून दोनवेळा मुदतवाढ घेतली होती. त्यानुसार 21 जुलैला अंतिम मतदार यादी जाहीर करण्याची मुदत होती. मात्र, या कालावधीत प्रशासनाला मतदार यादी जाहीर करता येऊ शकली नव्हती. अखेर शनिवारी 23 जुलैला ही अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, महापालिकेच्या संकेतस्थळावर 58 पैकी 27 प्रभागांच्या मतदार यादी अद्यापही जाहीर झालेल्या नाहीत. त्यामुळे संबंधित प्रभागातील नागरिकांना अद्यापही या मतदार यादीत आपले नाव आहे की नाही, यासंबंधीचे चित्र स्पष्ट होऊ शकलेले नाही.

अंतिम मतदार यादीचे काम पूर्ण झालेले आहे. शनिवारपासूनच महापालिकेच्या संकेतस्थळावर मतदारनिहाय यादी अपलोड करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र, हा डेटा मोठा असल्याने तो अपलोड होण्यास विलंब लागत आहे. त्यासाठी पालिकेची यंत्रणा काम करीत असून, लवकरच सर्व प्रभागांची मतदार यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध होईल.- संदीप कदम, उपायुक्त, पुणे मनपा

Back to top button