आचारसंहितेमुळे अडकलेली तलाठी यापदांची नियुक्ती प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे. आत्तापर्यंत दोन हजार 711 जणांनी नियुक्तिपत्रे दिली आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी 21 जिल्ह्यांमधील 982 उमेदवारांना नियुक्तिपत्रे दिली होती, तर आचारसंहितेनंतर एक हजार 729 जणांना नियुक्तिपत्रे दिली आहेत. आदिवासी क्षेत्रातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील पदांची नियुक्ती अद्याप झाली नसली तरी अन्य प्रवर्गांतील नियुक्ती केली आहे, अशी माहिती भूमिअभिलेख विभागाचे अतिरिक्त जमाबंदी आयुक्त आनंद भंडारी यांनी दिली.
मागील वर्षी जून महिन्यात (2023) मध्ये तलाठी पदांच्या चार हजार 793 जागांसाठी 10 लाख 41 हजार 713 एवढे अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी आठ लाख 64 हजार 960 उमेदवारांनी परीक्षा दिली. परीक्षेनंतर या पदांसाठी चार हजार 188 उमेदवारांची निवड केली होती. मात्र, पेसा क्षेत्रातील (आदिवासी बहुल क्षेत्रातील) जिल्ह्यांमधील पदभरतीविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्याने राज्यातील 13 जिल्ह्यांमधील निकाल राखून ठेवण्यात आला. पहिल्यांदा जाहीर केलेल्या गुणवत्ता यादीनंतर 21 जिल्ह्यांमध्ये यशस्वी उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणीची प्रक्रिया सुरू केली होती. पेसा क्षेत्र वगळून अन्य 23 जिल्ह्यांमध्ये 982 जणांंना नियुक्ती दिली होती. त्यानंतर निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे पेसा क्षेत्र असेलल्या काही जिल्ह्यांत नियुक्ती प्रक्रिया अडकली होती. आचारसंहिता संपल्यानंतर सर्वसाधारण क्षेत्रातील 582, तर पेसा क्षेत्रातील अनुसूचित जमातींव्यतिरिक्त एक हजार 147 उमेदवारांना नियुक्तिपत्रे दिली आहेत. आचारसंहितेपूर्वी 982, तर आचारसंहितेनंतर एक हजार 147 अशा एकूण दोन हजार 711 उमेदवारांना तलाठी पदावर रुजू होता आले आहे. अद्यापही दोन हजार 82 जागांवर नियुक्ती झालेली नाही, तर नांदेड, नंदुरबार, गडचिरोली, बुलडाणा, भंडारा या जिल्ह्यांत अद्याप एकाही उमेदवाराला नियुक्ती दिलेली नाही.