नवलाख उंबरे एमआयडीसीतील रस्त्याची दुरवस्था | पुढारी

नवलाख उंबरे एमआयडीसीतील रस्त्याची दुरवस्था

इंदोरी : पुढारी वृत्तसेवा : नवलाख उंबरे एमआयडीसी रस्त्याची पुरती दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी मोठ-मोठे खड्डे पडले असून, काही ठिकाणी असलेल्या ओबडधोबड गतिरोधकांचा वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. नवलाख उंबरे एमआयडीसी परिसरात अनेक कंपन्या असल्याने या ठिकाणी वाहनांची मोठी वर्दळ असते; तसेच कामगारांची नेहमी येथून ये-जा सुरु असते. रस्ता प्रशस्त असल्याने परिसरातील स्थानिक नागरिकही याच रस्त्याचा वापर करतात.

मात्र नवलाख उंबरे एमआयडीसी येथील रस्ता हा प्रशस्त असला तरी रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. औद्योगिक क्षेत्रातील रस्ते सुस्थितीमध्ये असणे गरजेचे असते; तसेच रात्रीच्यावेळी योग्यप्रमाणात प्रकाश असणे गरजेचे आहे; मात्र नवलाख उंबरे एमआयडीसी मात्र याला अपवाद ठरताना दिसत आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी पडलेले मोठ-मोठे खड्डे, रस्त्यावरील ओबडधोबड गतिरोधक, पार्किंग अभावी बर्‍याच ठिकाणी रस्त्याच्या बाजूलाच उभे असलेले कंटेनर, रस्त्याच्या कडेला वाहून आलेली माती या सर्व गोष्टीमुळे वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

एमआयडीसीमधून कातवी मार्गे तळेगाव स्टेशनकडे जाणार्‍या रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. तर तीन-चार महिन्यापूर्वीच डागडुजी केलेल्या कातवी रेल्वे पुलावर पुन्हा खड्डे पडल्यामुळे येथील रस्ते डागडुजीच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. तसेच साधारण दोन वर्षांपूर्वी स्टील घेऊन जाणार्‍या कंटेनरची धडक बसून दुभाजकावरील विजेचा खांब तुटला होता. आजही तो एका कोपर्‍यात पडलेला आहे. एमआयडीसीतील कंपन्यांकडे जाण्यासाठी छेद रस्ते केलेले आहेत. मात्र दुभाजकांवर वाढत जाणारी झाडे झुडपे यामुळेही तेथे अनेकवेळा लहान-मोठे अपघात घडत आहेत. त्यामुळे दुभाजकावरील झाडे हटवावी, अशी मागणी वाहन चालकांकडून होत आहे.

Back to top button