तीनच दिवसांत ‘बारणे’ प्रेम उफाळले , मावळ शिवसेना पदाधिकार्‍यांची भूमिका बदलली | पुढारी

तीनच दिवसांत ‘बारणे’ प्रेम उफाळले , मावळ शिवसेना पदाधिकार्‍यांची भूमिका बदलली

वडगाव मावळ : पुढारी वृत्तसेवा : खासदार श्रीरंग बारणे हे शिंदे गटात गेले तरी आम्ही पक्षासोबतच राहणार असल्याचे जाहीर करणार्‍या मावळ शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांचे “बारणे” प्रेम अवघ्या तीन दिवसात उफाळून आले आणि थेट खासदार बारणे यांची भेट घेऊन त्यांनीही शिंदे गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शरद हुलावळे, तालुकाप्रमुख राजेश खांडभोर, अंकुश देशमुख, धनंजय नवघणे, सुनील मोरे, सुनील हगवणे, सागर हुलावळे, सचिन हुलावळे यांनी आज खासदार बारणे यांची भेट घेऊन चर्चा केली, खासदार बारणे यांनी सर्वांचे थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणे करून दिले व त्यानंतर सर्वांनी बारणे यांच्या पाठोपाठ शिंदे गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, खासदार बारणे हे शिंदे गटात दाखल झाल्यानंतर लगेचच उपजिल्हाप्रमुख शरद हुलावळे यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यामुळे मावळ तालुका शिवसेनेच्या गोटात चांगलीच चलबिचल सुरू झाली. त्यामुळे शिवसेना पदाधिकार्‍यांची तातडीने दि.20 रोजी एक बैठक घेण्यात आली. या बैठकीत उपस्थितांनी खासदार बारणे यांच्याविषयी प्रेम, भावना व्यक्त केल्या परंतु, शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे आवश्यक असल्याने पक्षासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, अवघ्या तीन दिवसात मावळ शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी आपली भूमिका बदलली.

‘पुढारी’तील वृत्त ठरले खरे
शिवसेना पदाधिकार्‍यांच्या झालेल्या बैठकीत सर्वांनीच खासदार बारणे यांच्याविषयी आपुलकी व्यक्त केली होती. तसेच मावळातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे खासदार बारणे यांच्याशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध, तसेच ते पक्षाचे स्थानिक नेतृत्व असल्याने भविष्यात हे ”बारणे” प्रेम उफळण्याचा संकेत दै.पुढारी ने दिला होता, तो तिसर्‍याच दिवशी खरा ठरला आहे.

खासदार बारणे यांनी थेट मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी आमचा संवाद घडवून आणला, मुख्यमंत्री शिंदे यांनी बोलताना, आपण शिवसेना सोडलेली नाही, आपल्याला हिंदुहृदयसम—ाट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे न्यायचे आहेत, त्यासाठी अनेक मावळ्यांची गरज आहे, तुम्हीही माझ्या बरोबर रहा असे आवाहन केले. त्यानुसार त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देवून आम्ही शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे.
– राजेश खांडभोर, तालुकाप्रमुख, शिवसेना, मावळ

Back to top button