सेवा रस्त्यावर कचर्‍याचे साम्राज्य प्रशासनाचे दुर्लक्ष | पुढारी

सेवा रस्त्यावर कचर्‍याचे साम्राज्य प्रशासनाचे दुर्लक्ष

ताथवडे : पुढारी वृत्तसेवा :  येथील पुणे-मुंबई महामार्गावरील मुंबईच्या दिशेने जाणार्‍या पुनावळे पुलाजवळील सेवा रस्त्यावर कचर्‍याचे ढीग मोठ्या प्रमाणावर साचले आहेत. त्यामुळे महामार्गाचे विद्रुपीकरण झालेले असून, पावसामुळे कचरा कुजून परिसरात दुर्गंधी पसरलेली आहे. पुनावळे गावाचा विकास मोठ्या झपाट्याने होत आहे. या ठिकाणी अनेक उच्चभ्रू सोसायट्या आहेत. आजूबाजूला टोलेजंग इमारती असून अनेक आयटीजन्स या ठिकाणी वास्तव्यास आहेत. आजूबाजूचा विकास पाहता अनेक नामांकित विकसक या ठिकाणी आपली पाळेमुळे मजबूत करीत आहेत. त्यामुळे येथे अनेक गृहप्रकल्प नव्याने उदयास येत आहेत.

असे असताना जागोजागी कचर्‍याचे ढीग साचल्यामुळे परिसरातील सौंदर्यात बाधा निर्माण होत आहे. साचलेल्या कचर्‍याच्या दुर्गंधीमुळे वाहनचालकांना तसेच पादचार्‍याना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. अनेक बेजबाबदार नागरिक याठिकाणी कचरा टाकत आहेत. वेळोवेळी साफसफाई होत नसल्याने यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे लवकरात लवकर सेवा रस्त्यावरील कचर्‍याचे ढीग साफ करून परिसर स्वच्छ करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकाकंडून केली जात आहे.

Back to top button