मंचर : अवसरीतील अंगणवाड्यांची दुरवस्था | पुढारी

मंचर : अवसरीतील अंगणवाड्यांची दुरवस्था

मंचर; पुढारी वृत्तसेवा: अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथील अंगणवाड्यांची दुरवस्था झाली आहे. इमारतीचे दरवाजे मोडकळीस आले असून, भरदिवसा अंगणवाडीत साप निघत आहेत. पंचायत समितीच्या संबंधित विभागाने दुरुस्ती करावी, अशी मागणी आंबेगाव तालुका भाजयुमोचे अध्यक्ष मेघश्याम ऊर्फ बंटी भोर यांनी केली आहे. गावातील नागरिकांनी भाजयुमोचे तालुकाध्यक्ष मेघश्याम भोर यांच्याकडे अंगणवाडीच्या दुरवस्थेबाबत तक्रारी केल्या. त्यानंतर भोर व त्यांचे सहकारी सोशल मीडिया जिल्हा उपाध्यक्ष प्रसाद खोल्लम, भाजप शहराध्यक्ष स्वप्निल इंदोरे, भाजप कार्याध्यक्ष ओमकार शिंदे यांनी अंगणवाड्यांमध्ये जाऊन परिस्थितीची पाहणी केली.

बहुतेक सर्व अंगणवाड्यांच्या छतावरील पत्रे तुटलेल्या अवस्थेत आहेत. अंगणवाडीचे दरवाजे मोडकळीस आलेले असून, भरदिवसा अंगणवाडीमध्ये साप निघण्याचे प्रमाण वाढलेले आहे. तसेच, अंगणवाड्यांमध्ये सध्या वीजकनेक्शन कट केल्यामुळे लाइटची सोय नाही, असे आढळून आले. या अनुषंगाने भाजप तालुकाध्यक्ष डॉक्टर ताराचंद कराळे यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जालिंदर पठारे यांना भाजयुमो अध्यक्ष मेघश्याम भोर यांनी अंगणवाडी दुरुस्तीसंदर्भात निवेदन दिले.

या प्रसंगी संघटन सरचिटणीस संदीप बाणखेले, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सुशांत थोरात आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. गटविकास अधिकारी पठारे यांनी तातडीने दखल घेत अवसरी खुर्दचे ग्रामविकास अधिकारी जगन्नाथ शिदोरे, बालविकास अधिकारी प्रीतम बारभुवन यांना सदर अंगणवाड्यांची तातडीने पाहणी करून दुरस्तीसंदर्भात अहवाल तयार करून दुरुस्त्या करण्याचे आदेश दिले.

Back to top button