सातगाव पठार भागात बटाटा लागवड | पुढारी

सातगाव पठार भागात बटाटा लागवड

पेठ; पुढारी वृत्तसेवा: सातगाव पठार (ता. आंबेगाव) भागात पावसामुळे खोळंबलेली बटाटा लागवड पाऊस उघडल्याने सुरू झाली आहे. दोन दिवसांपूर्वी ज्या शेतकर्‍यांनी पावसात बटाटा लागवड केली त्यांचे ट्रॅक्टर खोल चिखलात रुतल्याने बटाटा लागवड थांबली होती.
सातगाव पठार भागांतील कुरवंडी, कोल्हारवाडी, थुगाव, भावडी आदी भागात अनेक शेतकर्‍यांनी पारंपरिक पद्धतीने बैलजोडीचा वापर करून बटाटे लागवड केली आहे. विविध कंपन्यांचे बटाटे बियाणे शेतकर्‍यांनी घेऊन ठेवले होते. त्यात हे बियाणे सडण्याची भीती शेतकर्‍यांमध्ये होती. काही प्रमाणात पावसाळी वातावरणामुळे बियाणे सडले. त्यामुळे शेतकर्‍यांनी लागवड करण्यास सुरुवात केली आहे.

पावसामुळे यांत्रिक पध्दतीने लागवड करण्यावर मर्यादा आल्याने पारंपरिक पध्दतीने बैलजोडीचा वापर करून शेतकरी बटाटे बियाणे लागवड करीत आहेत. यासाठी मजूर जोडीला सहाशे ते सातशे रुपये मजुरी द्यावी लागत आहे. पावसाचा जोर कमी झाल्याने आता शेतकरी लागवडीसाठी घाई करीत असल्याचे भावडी येथील शेतकरी सोपानराव गणपत नवले व थुगाव येथील शेतकरी विकास एरंडे यांनी सांगितले. सातगाव पठार भागात एकूण साडेसहा हजार एकर शेतीक्षेत्र आहे. यापैकी काही गावातील शेतकर्‍यांनी बटाटा लागवडीसाठी सुरुवात केली आहे. एक एकर बटाटा लागवडीसाठी बियाणे, खते, औषधे, खुरपणी, फवारणी व इतर कामासाठी पंचावन्न ते साठ हजार रुपये खर्च येतो, असे शेतकरी वसंतराव एरंडे व गोरक्षनाथ नवले यांनी सांगितले.

Back to top button