पिंपरी : रस्ते खोदाईमुळे वाहतुकीस अडथळा | पुढारी

पिंपरी : रस्ते खोदाईमुळे वाहतुकीस अडथळा

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : महेशनगर ते नेहरूनगर दरम्यान ऐन पावसाळ्यात पाइपलाइन टाकण्यासाठी रस्ते खोदाई करण्यात येत आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा होत आहे. शहरात पाइपलाइन, ड्रेनेज आणि सिमेंटचे रस्ते तयार करण्यासाठी खोदकाम करण्यात येत असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. काही ठिकाणी वारंवार दुरस्ती आणि खोदकामे सुरू आहेत. तसेच, ही खोदकामे अत्यंत सावकाश केली जात असल्याने वाहनचालक हैराण झाले आहेत.

महेशनगर ते नेहरूनगर दरम्यान पावसाळ्याच्या दिवसात पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. यासाठी रस्त्याच्याकडेला खोदकाम केले आहे. आधीच रस्त्यावर खड्डे असल्याने खड्डा चुकविताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. यामध्ये खोदकामामुळे रस्ते अरुंद झाले आहेत. गर्दीच्यावेळी चालकांना वाहने सावकाश चालवावी लागतात. बससारखी वाहने वेळेत पोहोचू शकत नाहीत. पावसाळ्यापूर्वी अशी कामे करावीत, अशी मागणी होत आहे.

Back to top button