जुन्नर : तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही : आ. अतुल बेनके | पुढारी

जुन्नर : तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही : आ. अतुल बेनके

जुन्नर, पुढारी वृतसेवा: तालुक्यातील गरजू, वंचित नागरिकांचे प्रश्न सोडविणे, त्यांना न्याय मिळवून देणे, हेच उद्दिष्ट घेऊन मी काम करत आहे. जोपर्यंत जनता सुखी नाही, तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही आणि त्यासाठीच मी आमदार झालो आहे, असे प्रतिपादन आ. अतुल बेनके यांनी केले. आझादी का अमृत महोत्सव या योजनेअंतर्गत शुक्रवारी (दि. 22) जुन्नर येथे आयोजित शासन आपल्या दारी अभियानात ते बोलत होते. या वेळी विविध गावच्या ग्रामस्थांना 350 दाखल्यांचे वाटप करण्यात आले. यामध्ये जातीचे दाखले, रेशनिग कार्ड्स, घरकुल मंजुरी आदेश, 8अ उतारे, बचत गटांना कर्ज मंजुरी आदी दस्तावेज आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते लाभार्थ्यांना देण्यात आले.

तसेच माणिकडोह येथील मत्स्यव्यवसाय करणार्‍या 13 कातकरी कुटुंबांना जाळी व साहित्य देण्यात आले. या वेळी बोतार्डे येथील ठाकर समाजातील 65 गरजूंना घरकुलासाठी जातीचे दाखले देण्यात आले. याप्रसंगी जिल्हा दूध संघाचे संचालक भाऊसाहेब देवाडे, तहसीलदार रवींद्र सबनीस, नायब तहसीलदार सचिन मुंढे, सहाय्यक गटविकास अधिकारी हेमंत गरिबे, प्रकल्प कार्यालयाचे कैलास खेडकर, वी. टी. भुजबळ, सरपंच संतोष केदारी, अजिंक्य घोलप, संतोष ढोबळे, उत्तम घुले, अमोल लांडे आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, अतिवृष्टीमुळे पश्चिम आदिवासी भागांत झालेल्या भातपिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने सुरू करण्यात आल्याचे आमदार बेनके यांनी या वेळी सांगितले. याप्रसंगी आदिवासी दुर्गम भागातील गरजूंना किराणा साहित्य वाटण्यात आले.

Back to top button