महामार्गावरून तळेगावात प्रवेश करणे धोक्याचे | पुढारी

महामार्गावरून तळेगावात प्रवेश करणे धोक्याचे

तळेगाव दाभाडे : जुन्या पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरून तळेगाव शहरामध्ये प्रवेश करताना वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे. या ठिकाणी सिग्नल व्यवस्था नसल्यामुळे अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

जुन्या पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरून सोमाटणे फाटा लिंबफाटा, तसेच वडगाव फाटा या ठिकाणावरून तळेगावमध्ये प्रवेश केला जात आहे. यामध्ये तळेगाव दाभाडे नगर परिषदेकडून नव्याने गावातील टेलिफोन एक्सचेंजपासून मुंबई-पुणे रस्त्याला जोडणारा 18 मीटरचा रस्ता करण्यात आला आहे. त्यामुळे तळेगाव स्टेशनकडे गाव भागातून जाणारी वाहतूक या रस्त्याचा वापर करत आहेत.

हा रस्ता नगर परिषदेने महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानाच्या माध्यमातून केला असून याची लांबी 800 मीटर रुंदी 18 मीटर आहे. या रस्त्याला एकूण चार कोटी सहा लाख रुपये खर्च झाला आहे. रस्त्यामध्ये काही ठिकाणी रस्ता रुंदीकरणांमध्ये अडचणी आलेल्या आहेत. परंतु, रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे.

या रस्त्याच्या दोन्ही बाजूला फुटपाथ, इलेक्ट्रिक पोल, गटर आदींचे नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी विजय सरनाईक व बांधकाम विभागाचे प्रमुख मल्लिकार्जुन बनसोडे यांनी दिली. रस्ता सुस्थितीमध्ये झाल्यामुळे या रस्त्यावर तळेगाव स्टेशन, माळवाडी, इंदोरी, आंबी आदी गावांना जाणारी वाहतूक देखील या रस्त्यावर वाढली आहे.

राष्ट्रीय महामार्गावरून या रस्त्यावर जाताना धोकादायक वळण घ्यावे लागते. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे सिग्नल उपलब्ध नाही. वाहनचालकाला सावध करण्यासाठी कोणतीही उपाययोजना नाही. त्यामुळे रस्त्याचे काम चांगले झाले असतानादेखील महामार्गावरून प्रवेश करताना वाहनचालकांना जीव मुठीत प्रवेश करावा लागत आहे. याबाबत महामार्ग प्रशासनाने त्वरित सुरक्षिततेच्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Back to top button