पुणे : शिवप्रेमींची पावसाळ्यातही दुर्गभमंतीला पसंती | पुढारी

पुणे : शिवप्रेमींची पावसाळ्यातही दुर्गभमंतीला पसंती

पुणे, पुढारी वृत्तसेवा: पावसाळा, हिवाळ्यात किल्ले चढून किल्ल्यावर तंबू ठोकून राहणार्‍या पर्यटक शिवप्रेमींना आपण नेहमीच पाहतो. मात्र, आता डोंगर खोर्‍यांमध्ये जोरदार कोसळणार्‍या भर पावसातसुद्धा शिवप्रेमी, ट्रेकर किल्ले चढण्यास पसंती देत असल्याचे पाहायला मिळत आहे. पूर्वी पावसाळा आला, की नागरिक पर्यटनाला घराबाहेर पडायचे नाहीत. हिवाळ्यात आणि उन्हाळ्यातच नागरिक फिरण्यासाठी घराबाहेर पडायचे. परंतु, आता उन्हाळा असो, हिवाळा असो किंवा पावसाळा असो, सर्वच ऋतू फिरणार्‍या हौशी शौकिनांसाठी सारखेच झाले आहेत. आता पावसाळी पर्यटनासाठी पर्यटक पुणे आणि परिसरातील किल्ल्यांना ज्यादा पसंती देत असल्याचे दिसत आहे. पावसाळ्यात निसर्गाला बदललेल्या स्वरूपामुळे, त्याच्या हिरवेगार सान्निध्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक किल्ल्यांवर चढाई करीत आहेत.

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
मध्यंतरीच्या काळात जिल्हा प्रशासनाने हवामान खात्याने दिलेल्या रेड अलर्टमुळे किल्ल्यांवरील पावसाळी पर्यटनास बंदी करण्यात आली होती. आता मात्र पुन्हा किल्ल्यांवर नागरिकांची गर्दी होत असल्याचे पाहायला मिळत आहेत. यात नागरिक किल्ले चढतानाचे आणि किल्ल्यावरील निसर्गसौंदर्याचे गाणी लावलेले रिल्स, व्हिडिओ स्टेट्स स्टोरीला शेअर करीत आहेत.

पावसाळी पर्यटन आनंददायी की धोकादायक?
पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी सर्वच नागरिक आतुरलेले असतात. कधी पावसाळा येतोय आणि कधी आपण पावसात भिजत फिरण्याचा आनंद घेतोय, असे सर्वांना वाटते. परंतु, पावसाळी पर्यटन जेवढे आनंददायी असते, तेवढेच धोकादायकदेखील आहे, असे तज्ज्ञांनी सांगितले. कारण आपण पावसाळ्यात दर्‍याखोर्‍यांमध्ये पावसाळ्यात जातो. त्या वेळी येथील भागांमध्ये सर्वाधिक पाऊस पडत असतो. याच वेळी दरड कोसळणे, रस्ता निसरडा होणे, ओढ्यांना पाणी येणे, सरपटणार्‍या प्राण्यांचा धोका, यांसारख्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे पर्यटकांनी शक्यतो पावसाळी पर्यटन टाळावे. करायचे झाल्यास स्वत:ची आणि इतरांची काळजी घ्यावी.

सरकारी गाड्यांमार्फत पावसाळी पर्यटनासाठी सुविधा
रेल्वे, एसटीच्या गाड्यांमार्फत पावसाळी पर्यटनासाठी विशेष गाड्या सोडण्यात आल्या आहेत. त्याव्यतिरिक्त त्याच मार्गावर नियमितपणे धावणार्‍या गाड्यादेखील फुल्ल भरून जात आहेत. रेल्वेने तर फक्त लोणावळा, खंडाळा, बोर घाटातील निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी विशेष ‘विस्टाडोम’ कोच बसविण्यात आले आहेत. यालासुद्धा पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.

मागच्या आठवड्यात पन्हाळा किल्ला ते पावनखिंडीपर्यंत आम्ही जवळपास सातशे जणांनी भर पावसात पर्यटन केले. सुमारे 48 किलोमीटर इतके अंतर होते. या वेळी स्वत:ची आणि इतरांचीही योग्य काळजी आम्ही घेतली. मी छत्रपती शिवाजी महाराजांवर आणि त्यांच्या किल्ल्यांवर ऐतिहासिक लेखन करतो. त्यानिमित्ताने किल्ल्यांवर नेहमी भ्रमंती असते. येथील इतिहास आणि त्या वेळचा शिवकाळ आम्ही येथे येऊन जगण्याचा प्रयत्न करीत असतो.

                                                     – राहुल नलावडे, पर्यटक, दुर्ग भ्रमंतीकार

Back to top button