आंबेगाव : नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करा: अ‍ॅड. राजेंद्र बेंडे पाटील यांची मागणी | पुढारी

आंबेगाव : नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करा: अ‍ॅड. राजेंद्र बेंडे पाटील यांची मागणी

महाळुंगे पडवळ; पुढारी वृत्तसेवा: आंबेगाव तालुक्याच्या उत्तर पश्चिम व सातगाव पठार भागात मुसळधार पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. मुख्यमंत्र्यांनी पीक पाहणीचा आढावा घेऊन शेतकर्‍यांना दिलासा द्यावा, अशी मागणी किसान काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अ‍ॅड. राजेंद्र बेडे पाटील आणि सरचिटणीस बाळासाहेब इंदोरे यांनी केली आहे. मागील दहा दिवसांपासून आंबेगावच्या पश्चिम व उत्तर भागात मुसळधार पाऊस पडत आहे.

सातगाव पठार भागात लागवड झालेले बटाटे चढण्याच्या स्थितीत आहेत, बीट पाण्यात आहे, पालेभाज्यावर्गीय पिके सडू लागली आहेत, भुईमूगच्या शेंगांना मोड फुटले आहेत, कोबी तसेच फ्लावर या पिकांवर घाण्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. सोयाबीन पीक संपूर्ण पिवळे पडले आहे, पिकांची वाढ खुंटली आहे, मका पिकाचा जनावरांसाठी उपयुक्त असलेला ओला चारा काळा पडू लागला आहे, ऊस पिकाच्या सर्‍यांमध्ये दोन फूट पाणी असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे, सखल जमिनीमधून पाण्याचा निचरा होत नसल्याने जमिनी उपळल्या आहेत.

त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. महसूल व कृषी कार्यालयामार्फत तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांचे पाहणी करून पंचनामे करण्यात यावे, अशी मागणी शेतकर्‍यांमधून होत आहे.

Back to top button