बारामती : युवकाच्या कानातील बाळी हिसकावली | पुढारी

बारामती : युवकाच्या कानातील बाळी हिसकावली

बारामती, पुढारी वृत्तसेवा: दुचाकीवरून मित्रासह मध्यरात्री घरी जात असलेल्या युवकाला अडवत दोघांनी त्याच्या कानातील सोन्याची बाळी जबरीने हिसकावली. घटनेत युवकाच्या कानाला गंभीर दुखापत झाली. त्याच्याकडील मोबाईलही हिसकावून घेण्यात आला. या प्रकरणी शहर पोलिसांनी दोघा अज्ञातांविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. शहर पोलिस ठाण्यात याबाबत प्रदीप लहू खराडे (वय 24, रा. चौधरवस्ती, वंजारवाडी, ता. बारामती) यांनी फिर्याद दिली. सोमवारी (दि.18) मध्यरात्री सव्वा दोनच्या सुमारास ही घटना घडली. फिर्यादी हा एमआयडीसीतील एका कंपनीत काम करतो. घटनेदिवशी तो मित्र प्रतीक मुंगळे याच्यासह वालचंदनगरला गेला होता.

माघारी आल्यावर रात्री सव्वा दोनच्या सुमारास ते दोघे बारामती बस स्थानकाजवळून जात असताना 25 ते 30 वयाच्या दोघांनी त्यांची दुचाकी थांबवली. त्यातील एकाने चाकूचा धाक दाखवत फिर्यादी व त्याच्या मित्राकडील मोबाईल जबरीने काढून घेतला. एकाने फिर्यादीला धरून ठेवले, तर दुसर्‍याने त्याच्या कानातील सोन्याची बाळी हिसकावून घेतली. यात डाव्या कानाला जखम होऊन रक्त येऊ लागले. लुटमार करणारे दोघेही पळून गेले. घटनेत दोन मोबाईल व कानातील बाळी असा 14 हजारांचा माल लुटला.

Back to top button