परतीचा पालखी सोहळा पुण्यात; आज शहरातच मुक्काम | पुढारी

परतीचा पालखी सोहळा पुण्यात; आज शहरातच मुक्काम

पुणे, पुढारी वृत्तसेवा: टाळ-मृदंगाच्या गजरात, जय जय राम कृष्ण हरीचा जयघोष…भजन-कीर्तनाने रंगलेला माहोल…रंगोळ्याच्या पायघड्या अन् फुलांची सजावट…विद्युत रोषणाईने उजळलेले मंदिर अन् दर्शनासाठी झालेली गर्दी…असे भक्तिपूर्ण वातावरण गुरुवारी (दि. 21) श्री विठ्ठल मंदिरांमध्ये पाहायला मिळाले. पंढरपूरच्या आषाढी यात्रेनंतर परतीच्या मार्गावर असलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे भवानी पेठेतील पालखी विठ्ठल मंदिरात आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे नवी पेठेतील श्री विठ्ठल मंदिरात आगमन झाले. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा 22 जुलैपर्यंत मुक्काम असणार आहे.

शनिवारी (दि. 23) या पालख्या मार्गस्थ होणार आहेत. भवानी पेठेतील पालखी विठ्ठल मंदिराचे विश्वस्त गोरखनाथ भिकुले म्हणाले, “पंढरपूर येथून परतीच्या मार्गावर निघालेली संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी गुरुवारी सकाळी सहा वाजता आली. पालखीचे परंपरेनुसार आणि रीतीनुसार स्वागत करण्यात आले. भाविकांनीही दिवसभर दर्शनासाठी गर्दी केली. भजन-कीर्तनाने मंदिरात वेगळाच रंग बहरला. पालखी शनिवारी सकाळी दहा वाजता श्री क्षेत्र आळंदीकडे मार्गस्थ होईल.

” “संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे सायंकाळी पाच वाजता आगमन झाले. रांगोळ्याच्या पायघड्या, विद्युत रोषणाई, फुलांची सजावट, भाविकांबरोबर वारकर्‍यांची गर्दी अन् भजन-कीर्तनाच्या कार्यक्रमाने मंदिरांत वेगळेच वातावरण पाहायला मिळाला. पालखीच्या मुक्काम काळात रात्री कीर्तन आणि जागर होईल. शनिवारी सकाळी सात वाजता पालखी श्रीक्षेत्र देहूकडे प्रस्थान करणार आहे”, असे मंदिराच्या पदाधिकार्‍यांनी सांगितले.

Back to top button