पुणे : पेठ ते पारगाव रस्त्याची चाळण | पुढारी

पुणे : पेठ ते पारगाव रस्त्याची चाळण

पेठ, पुढारी वृत्तसेवा : पेठ (ता. आंबेगाव) पासून पारगावतर्फे खेड या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. मोठमोठे खड्डे पडल्याने दुचाकी, चारचाकी वाहनचालक त्रस्त झाले आहेत. या रस्त्यावर खड्डे पावसाने पडल्यामुळे जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. येथील खड्डे त्वरित बुजवावेत, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना नेते विलासराव पवार यांनी दिला आहे.

पेठ-पारगाव रस्त्याची पूर्ण दुरवस्था झाली आहे. दोन ते तीन फूट खोल व चार ते पाच फूट लांबीचे खड्डे या रस्त्यावर आहेत. सध्या शेतकरी बटाटा बियाणे, खते वाहतूक करीत आहेत. येथून दुचाकी वाहनांची चाके पंक्चर होत आहेत, तर चारचाकी वाहने अनेकवेळा खालून खड्ड्यातून वर येताना रस्त्याचा कोपरा, दगड लागल्याने ऑईल टाकी फुटल्याचे प्रकार घडले आहेत.

ट्रक गाड्या अती लोड असल्याने पलटी होण्याची भीती शेतकर्‍यांनी व्यक्त केली आहे. सध्या पाऊस अल्पप्रमाणात पडत आहे, त्यामुळे रस्त्यावर चिखल वाढला आहे. प्रवास करताना वाहनचालक जीव मुठीत धरून वाहन चालवित असल्याचे चित्र आहे. रोज शेकडो दुचाकी, चारचाकी, मोठे ट्रक व ट्रॅक्टर या रस्त्याने ये-जा करत असतात, त्यामुळे मृत्यूचा सापळा बनलेला रस्ता युद्धपातळीवर दुरुस्त करण्यात येऊन खड्ड्यात मुरुम व खडी टाकावी, अशी मागणी शिवसेना नेते विलासराव पवार यांनी केली आहे.

Back to top button