मावळ शिवसेना ठाकरेंसोबत, कार्यकर्त्यांच्या बैठकीत निर्णय | पुढारी

मावळ शिवसेना ठाकरेंसोबत, कार्यकर्त्यांच्या बैठकीत निर्णय

वडगाव मावळ : पुढारी वृत्तसेवा :  मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला असला तरी मावळ तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिकांनी मात्र पक्षासोबतच राहण्याचा निर्णय आज झालेल्या बैठकीत झाला असल्याची माहिती शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजेश खांडभोर यांनी दिली.

दोन दिवसांपूर्वी खासदार बारणे यांनी थेट शिंदे गटात सहभागी होऊन पक्षासोबत राहण्याची आपली भूमिका बदलल्यामूळे मावळ तालुक्यातील शिवसेनेच्या गोटात चलबिचल सुरू झाली. बारणे हे शिवसेनेचे खासदार असल्याने एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसैनिकांचे नेतृत्व मानले जाते. त्यामुळे ते शिंदे गटात गेल्याने मावळ तालुक्यातील शिवसेना कार्यकर्त्यांचे काय असा प्रश्न राजकीय वर्तुळात निर्माण झाला होता.

या पार्श्वभूमीवर आज मावळ तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी उपजिल्हाप्रमुख शरद हुलावळे, तालुकाप्रमुख राजेश खांडभोर, सल्लागार भारत ठाकूर, शांताराम भोते, संघटक अंकुश देशमुख, उपतालुकाप्रमुख मदन शेडगे, चंद्रकांत भोते, आशिष ठोंबरे, अनिल ओव्हाळ, शहरप्रमूख बाळासाहेब फाटक, दत्ता भेगडे, सुनिल हगवणे, सतीश इंगवले, रवी गायकवाड, भरत नायडू, डॉ.विकेश मुथा, राम सावंत, उमेश गावडे, सोमनाथ कोंडे, गणेश भोकरे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी उपस्थितांनी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह खासदार बारणे यांच्याविषयी आपल्या प्रेम भावना व्यक्त केल्या.

खासदार बारणे यांच्याविषयी आपुलकी असली तरी पक्ष संघटनाही महत्वाची आहे असे मत अनेकांनी व्यक्त केले. सर्व पदाधिकार्‍यांच्या भावना जाणून घेतल्यानंतर अखेर शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून पक्ष संघटनेबरोबरच राहण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. त्यामुळे मावळातील शिवसेना कार्यकर्त्यांची भूमिका काय? या चर्चेला तूर्त पूर्णविराम मिळाला आहे.

वास्तविक, राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असली तरी मावळ तालुक्यात मात्र राष्ट्रवादी कडून शिवसेनेला सापत्नीक वागणूक दिली जात असल्याचा आरोप यापूर्वी शिवसेना पदाधिकार्‍यांनी केला होता. तर दुसरीकडे खासदार बारणे यांच्याकडून मिळणारी ताकद, विकासकामांसाठी मिळणारा निधी यामुळे खासदार बारणे यांच्याविषयी मावळातील शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये आपुलकीची भावना कायम राहिली आहे.

भविष्यात ‘बारणे’ प्रेम उफाळण्याचे संकेत
दरम्यान, मावळ तालुक्यातील बहुतांश पदाधिकारी, कार्यकर्ते यांना खासदार बारणे यांच्याविषयी अत्यंत आपुलकी असून खासदार बारणे यांचेही येथील कार्यकर्त्यांशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत. तसेच बारणे यांच्याकडे स्थानिक नेतृत्व म्हणून पाहिले जाते. त्यामुळे मावळातील शिवसैनिक आज पक्षासोबत असले तरी भविष्यात त्यांचे ‘बारणे’ प्रेम उफाळण्याची शक्यता नाकारता येत नाही याचे संकेत आजच्या बैठकीत कार्यकर्त्यांनी मांडलेल्या भूमिकेवरून दिसत आहेत.

शरद हुलावळेंचे शिंदे गटात जाण्याचे संकेत
: मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्यासोबत मी असून ते जिथे असणार तिथेच मीदेखील असणार आहे, बारणे जो निर्णय घेतील त्याला आमचा पूर्ण पाठिंबा राहील, असे सांगत मावळ तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शरद हुलावळे यांनी शिवबंधन सोडून शिंदे गटात जात असल्याचे संकेत दिले आहेत.

Back to top button