खडकवासला : धरण साखळीत 20 दिवसांत 22 टीएमसी पाणी जमा | पुढारी

खडकवासला : धरण साखळीत 20 दिवसांत 22 टीएमसी पाणी जमा

खडकवासला : सध्या पावसाचा जोर कमी झाला असला, तरी गेल्या वीस दिवसांत अतिवृष्टी व संततधारेमुळे तळपातळी गाठलेल्या खडकवासला धरण साखळीत तब्बल 22 टीएमसीपेक्षा अधिक पाणी जमा झाले. पानशेत -वरसगावच्या डोंगरी पट्ट्यात बुधवारी (20) सकाळपासून पावसाची रिमझिम सुरू आहे. सायंकाळी पाच वाजता पानशेत धरणातील पाणीसाठा 69.50 टक्के झाला आहे. तर खडकवासला धरण साखळीत 19.57 टीएमसी म्हणजे 67.12 टक्के साठा झाला आहे.

30 जून रोजी धरण साखळीत 2.57 टीएमसी म्हणजे अवघा 8.80 टक्के अल्प साठा होता.1 जुलैपासून धरणक्षेत्रात अतिवृष्टी व नंतर संततधार पावसामुळे पाण्याची आवक वाढली. सध्या पावसाचा जोर ओसरला असला, तरी डोंगरी पट्ट्यात पावसाळी वातावरण कायम आहे. त्यामुळे आठ-दहा दिवसांत साखळी शंभर टक्के भरण्याची शक्यता आहे. सलग वीस दिवसांच्या पावसाने धरण साखळीत तब्बल 22 टीएमसीपेक्षा अधिक पाण्याची भर पडली. त्यातील जवळपास साडेतीन म्हणजे 3.34 टीएमसी जादा पाणी खडकवासलातून मुठा नदीत सोडले.

या शिवाय मुठा कालव्यासह पिण्यासाठी जवळपास अडीच टीएमसी पाणी सोडले आहे. खडकवासला जलसंपदा विभागाचे उपविभागीय अभियंता योगेश भंडलकर म्हणाले, ‘खडकवासला धरण शंभर टक्के भरल्याने जादा पाणी मुठा नदीत सोडण्यात आले. या पाण्याचा लाभ उजनी धरणाला झाला आहे, तर मुठा कालव्यात सोडण्यात आलेल्या पाण्याचा लाभ जिल्ह्यातील शेती व पिण्यासाठी झाला आहे.’

केवळ 1 मिमी पडला पाऊस
खडकवासला धरण क्षेत्रात तुरळक पाऊस आहे; मात्र पानशेत, वरसगाव, मुठा भागात पावसाची रिमझिम आहे. त्यामुळे ओढे नाल्यातून पाण्याची भर तिन्ही धरणात पडत आहे. बुधवारी दिवसभरात टेमघर येथे 20, पानशेत येथे 7, वरसगाव येथे 8 व खडकवासला येथे फक्त 1 मिलीमीटर पाऊस पडला. खडकवासलातील धरणसाठा 100 टक्के झाला असून, वरसगाव धरण 63.86 टक्के, पानशेत 69.50 टक्के व टेमघर 54.06 टक्के भरले आहे.

Back to top button