पिंपरी : 34 जणांना संधी! ओबीसी आरक्षणाचा निर्णय | पुढारी

पिंपरी : 34 जणांना संधी! ओबीसी आरक्षणाचा निर्णय

मिलिंद कांबळे : 
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेची आगामी निवडणूक नागरिकांच्या मागास वर्गाच्या (ओबीसी) आरक्षणासह होणार आहे. पिंपरी-चिंचवड शहरात त्रिसदस्यीय 46 प्रभाग रचनेत ओबीसीच्या आरक्षणानुसार एकूण 139 पैकी 34 जागांवर संधी मिळणार आहे. त्यात 17 नगरसेविका असतील. या बदलामुळे अनुसूचित जाती (एससी) व अनुसूचित जमाती (एसटी)च्या 25 जागांचे निश्चित झालेले आरक्षण कायम ठेवून उर्वरित जागांमधून ओबीसी व महिला जागेसाठी पुन्हा आरक्षण सोडत काढले जाणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील निवडणुकीसाठी ओबीसी वर्गासाठी आरक्षणास बुधवारी (दि.20) मंजुरी दिली आहे. महापालिकेची निवडणूक आता ओबीसी आरक्षणासह होणार आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीचे चित्र पुन्हा बदलणार आहे. ओबीसी आरक्षण हे सरसकट नसून प्रत्येक नगरपरिषद ते महापालिकेच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आहे.

ओबीसीच्या 27 टक्के आरक्षणासह 139 पैकी 38 जागा आरक्षित होतात. मात्र, त्या जागा घटून आता 34 जागा ओबीसीसाठी असतील, असे अधिकार्‍यांनी सांगितले. फेबु—वारी 2017 च्या निवडणुकीत एकूण 128 पैकी 35 नगरसेवक हे ओबीसी गटातून निवडून आले होते. मागील तुलनेत यंदा ओबीसीची एक जागा कमी झाली आहे.

दरम्यान, महापालिकेच्या वतीने ओबीसीशिवाय आरक्षण सोडत 31 मे रोजी प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात काढण्यात आली. ‘ओबीसी आरक्षणास मंजुरी मिळाल्यास पुन्हा सोडत’ असे वृत्त ठळक ‘पुढारी’ने 3 जूनला प्रसिद्ध केले होते. ते न्यायालयाच्या आदेशावरून खरे ठरले आहे. एससी व एसटीच्या एकूण 25 जागेवरील आरक्षण कायम ठेवून उर्वरित 114 जागांतील 34 जागा ओबीसीसाठी राखीव असतील. त्यातील 17 जागा ओबीसी महिलांसाठी राखीव असणार आहेत.

तर, उर्वरित खुल्या गटातील 80 जागा असतील. त्यातील 40 जागा महिलांसाठी राखीव असणार आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाला एससी व एसटी आरक्षण वगळून उर्वरित 114 जागांसाठी पुन्हा आरक्षण सोडत प्रक्रिया राबवावी लागणार आहे. त्यानंतर प्रत्येक प्रभागातील चित्र पुन्हा बदलणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहराची सद्यस्थिती
एकूण प्रभाग – 46
एकूण नगरसेवक-139
एससी लोकसंख्या-2,73,810
एसटी लोकसंख्या-36,535
एकूण लोकसंख्या-17,27,692
एकूण मतदार-15,00,693

ओबीसी आरक्षणासह महापालिकेत असे असेल चित्र
वर्ग एकूण सदस्य संख्या महिलांच्या जागा
सर्वसाधारण गट (ओपन) 80 40
अनुसूचित जाती (एससी) 22 11
अनुसूचित जमाती (एसटी) 03 02
नागरिकांचा मागास वर्ग (ओबीसी) 34 17
एकूण 139 70

Back to top button