पुणे : प्रत्येक दृष्टिहीन भीक मागत नाही; चिंतामणी आल्हाट यांचा संदेश | पुढारी

पुणे : प्रत्येक दृष्टिहीन भीक मागत नाही; चिंतामणी आल्हाट यांचा संदेश

पुणे, पुढारी वृत्तसेवा: दृष्टिहीन लोकांना मदत करा… वजन करा पण भीक देऊ नका…अशा आशयाचे फलक घेऊन ते रोज लक्ष्मी रस्त्यावर वजन काटा घेऊन बसतात! अनेक जण त्यांचा हा फलक न्याहाळून निघून जातात, तर काही जण त्यांच्याकडे असलेला हा फलक पाहून काट्यावर वजन करून त्यांच्या मेहनतीला मोबदलाही देतात… कारण भीक मागण्यापेक्षा मेहनत करून कमावण्यावर दृष्टिहीन चिंतामणी आल्हाट यांचा विश्वास आहे!

लोकांसमोर हात पसरण्यापेक्षा मेहनत करून आल्हाट हे आपल्या कुटुंबाची जबाबदारी पेलत आहेत भीक मागण्यापेक्षा मेहनत करून जगा, हा संदेश ते त्यांच्याजवळ असलेल्या फलकातून लोकांना देत आहेत. 40 वर्षीय चिंतामणी हे जन्मतः दृष्टिहीन आहेत. त्यांची पत्नी मंगल याही दृष्टिहीन असून, त्या गृहिणी आहेत. दोघेही नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथील पारगावचे निवासी आहेत. आल्हाट यांनी पुण्यात खूप जागी नोकरीचा शोध घेतला, पण त्यांना नोकरी मिळाली नाही. मग त्यांनी काही काळ खेळणी विकण्याचा व्यवसाय केला. या कामाने त्यांना आधार दिला आणि कुटुंब सांभाळण्यासाठीचा मार्गही! मात्र, काही कारणाने त्यांचा हा व्यवसायही बंद पडला.

या परिस्थितीत त्यांनी कधी कोणाकडे हात पसरला नाही किंवा भीक मागितली नाही. त्यांचा हाच स्वाभिमान पाहून मुंबईतील एका संस्थेने एक फलक दिला आणि एक वजन काटाही भेट दिला. त्या फलकावर एक खास मजकूर लिहिण्यात आला. आजही ते हा फलक लावून वजन काट्याचा व्यवसाय करत आहेत. त्यांचा मुलगा आणि मुलगी महाविद्यालयीन शिक्षण घेत आहेत. भरपावसातही ते आपला व्यवसाय करत आहेत.

दृष्टिहीन असलो तरी मेहनत तरी करावी लागणारच. तेच मी करत आहे. माझ्या व्यवसायाने माझ्या कुटुंबाला आधार दिला आहे आणि मला आर्थिक मोबदलाही. मला भीक मागायला आवडत नाही. म्हणून मी हा फलक घेऊन समाजाला हा संदेश देतोय की, मला भीक देऊ नका, तर माझ्या कामाला योग्य मोबदला द्या.
                                                                           -चिंतामणी आल्हाट

Back to top button