पुणे : जिल्हा परिषद प्रशासनाची चपळाई; नव्या सरकारकडून कामांना स्थगिती | पुढारी

पुणे : जिल्हा परिषद प्रशासनाची चपळाई; नव्या सरकारकडून कामांना स्थगिती

पुणे, पुढारी वृत्तसेवा: राज्यात सरकार बदलानंतर पूर्वीच्या सरकारने मंजूर केलेली ग्राम विकास विभागाची कामे थांबविण्याचे आदेश जिल्हा परिषदेला दिले. मात्र, पुणे जिल्हा परिषदेने हा आदेश येण्यापूर्वीच ‘हंड्रेड डेज’ उपक्रम राबवून कामे चपळाईने पूर्ण करण्याच्या दिशेने पाऊले टाकली. त्यामुळे नव्या सरकारच्या या आदेशाचा 1 हजार 31 कामांपैकी केवळ 26 कामांना फटका बसणार आहे.
जिल्हा परिषद प्रशासनाने गेल्या काळात ही काम वेगाने करण्याचे आदेश दिले होते.

‘हंड्रेड डेज’ उपक्रमांतर्गत या कामांबाबत तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांच्याकडून सतत आढावा घेण्यात येत होता. परिणामी, सध्याच्या सरकारच्या निर्णयाचा जिल्ह्यातील कामांना फटका बसला नाही. कारण 1 हजार 5 मंजूर कामांना कार्यारंभ आदेश दिला होता. त्याचबरोबर कामांची कार्यवाही अगोदरच पूर्ण झाली. जिल्हा परिषदेने गतवर्षी राबविलेल्या हंड्रेड डेज कार्यक्रमामुळे ही कामे वेळेत पूर्ण झाली. एकूण 1 हजार 31 कामे होती.

त्यातील सर्व कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली, तर 1 हजार 26 कामांना तांत्रिक मान्यता देऊन 1 हजार पाच कामांच्या वर्कऑर्डरदेखील दिल्या आहेत. केवळ 26 कामांच्या वर्कऑर्डर प्रलंबित आहेत. राज्यातील अन्य जिल्हा परिषदेमध्ये मात्र कामाची कार्यवाही करण्यास उशीर झाल्याने नव्या सरकारच्या आदेशाचा मोठा परिणाम झाला आहे, परंतु पुणे जिल्हा परिषद मात्र कामे वेळेत पूर्ण करण्यात यशस्वी झाली आहे.

‘जिल्हा नियोजन’च्या कामांना मात्र फटका
जिल्हा नियोजन समितीकडील 612 कोटी रुपयांच्या कामांची कार्यवाही स्थगिती आदेशामुळे थांबली आहे. एकूण 815 कोटी रुपयांचा हा आराखडा आहे. या कामांचा फेरआढावा घेण्याचा निर्णय नव्या सरकारने घेतला आहे. नवे पालकमंत्री झाल्यानंतर त्यावर पुढील निर्णय होईल, असे प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी सांगितले. ही कामे स्थगिती येण्यापूर्वीच झाली पूर्ण

पंचायत समित्यांकडे प्रशासकीय इमारत बांधण्याची 19 कामे ग्रामीण विकास कार्यक्रमांतर्गत निवासी 11 इमारती, रस्ते-पूल गट क 5 कामे, रस्ते-पूल गट ड 6 कामे, गट ब 149 कामे, गट अ 40 कामे, ग्रामीण रस्त्यांची 763 कामे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत इमारतींची 12 कामे यांची वर्कऑर्डर देण्याची कार्यवाही स्थगिती आदेश येण्यापूर्वीच पूर्ण झालेली आहेत.

Back to top button