पुण्यात आता स्वाइन फ्लूचे संकट! चार दिवसांत आढळले सहा रुग्ण | पुढारी

पुण्यात आता स्वाइन फ्लूचे संकट! चार दिवसांत आढळले सहा रुग्ण

पुणे, पुढारी वृत्तसेवा: कोरोनाची साथ ओसरत असल्याचे चित्र दिसत असतानाच आता शहरात स्वाइन फ्लूचे संकट घोंघावू लागले आहे. शहरात 1 जानेवारीपासून 15 जुलैपर्यंत 5 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर पुढील चार दिवसांमध्ये स्वाइन फ्लूचे निदान झालेल्या रुग्णांची संख्या 12 झाली आहे. पुण्यात 1 जानेवारी ते 19 जुलै 2022 दरम्यान 6507 संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 3101 जणांना टॅमी फ्लूचा डोस देण्यात आला आणि त्या सर्वांच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले. त्यापैकी 12 जणांमध्ये स्वाइन फ्लूचे निदान झाले आहे. सध्या 110 संशयित रुग्ण, तर 12 निदान झालेले रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. आतापर्यंत 6 जणांना घरी सोडण्यात आले आहे. जानेवारीपासून आजपर्यंत एका रुग्णाचा मृत्यू झाला.

आजार अंगावर काढू नका
श्वसनाशी संबंधित आजारांकडे दुर्लक्ष करू नये. ताप, सर्दी, खोकला, श्वास घेण्यास त्रास, भूक मंदावणे, अशी लक्षणे अंगावर काढू नयेत, असे आवाहन डॉक्टरांकडून करण्यात येत आहे.

शहरात गेल्या चार दिवसांमध्ये स्वाइन फ्लूचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. पावसाळयाच्या पार्श्वभूमीवर साथीच्या आजारांपासून सावध राहणे, स्वच्छता राखणे आवश्यक आहे. विशेषत:, अतिजोखमीच्या व्यक्तींनी जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. खासगी रुग्णालयांमध्ये स्वाइन फ्लूची लस उपलब्ध आहे.
                 

                 – डॉ. संजीव वावरे, सहायक आरोग्य अधिकारी, पुणे महानगरपालिका

Back to top button