पुणे जिल्ह्यात शिवसेनेच्या अडचणी वाढणार | पुढारी

पुणे जिल्ह्यात शिवसेनेच्या अडचणी वाढणार

पुणे, सुहास जगताप : माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील आणि माजी राज्यमंत्री विजय शिवतारे या शिवसेनेच्या दोन दिग्गज नेत्यांनी पक्षाला जय महाराष्ट्र करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केल्याने शिवसेनेला पुणे जिल्ह्यात मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल, असे चित्र आहे.

पंधरा वर्षे खासदार असलेले आढळराव-पाटील आणि दहा वर्षे आमदार, पाच वर्षे राज्यमंत्री असलेले विजय शिवतारे हे दोन्ही नेते शिरूर आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे मजबूत आधारस्तंभ होते. या दोन्ही नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसशी उघड राजकीय वैर घेऊन त्यांना प्रखर विरोध करत जिल्ह्यात शिवसेनावाढीसाठी संघर्ष केला आहे. गावपातळीवरील शिवसैनिकांपर्यंत या दोघांचा संपर्क असल्याने पक्षात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे.

शिवतारे यांनी तर देश आणि राज्यपातळीवर राजकारणात बलाढ्य अशा बारामतीच्या पवार घराण्याशी राजकीय वैर घेऊन बारामती लोकसभा मतदारसंघात अस्तित्वहीन असलेल्या शिवसेनेला मोठी राजकीय ताकद मिळवून दिली आहे, यामुळेच गेल्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांनी पूर्ण ताकद लावून शिवतारे यांचा पराभव घडवून आणला. यासाठी राष्ट्रवादीची आघाडीतील जागाही अजित पवार यांनी काँग्रेससाठी कोणतेही आढेवेढे न घेता सोडली. या पराभवाला शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनीही रसद पुरविल्याचा आरोपही नुकताच शिवतारे यांनी केला आहे. पवारांची पूर्णपणे पकड असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे मजबूत स्थान शिवतारे यांनी निर्माण केले असल्याने आता एवढे मजबूत नेतृत्व बारामती लोकसभा मतदारसंघात निर्माण करण्याचे मोठे आव्हान शिवसेनेसमोर आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघातही आढळराव-पाटील यांनी राष्ट्रवादीला टक्कर देत शिवसेना वाढवली. तीनवेळा खासदारकीला विजयी झाले. शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघात आज शिवसेनेची मोठी ताकद दिसते, त्याचे श्रेय आढळराव-पाटील यांच्या संघटनात्मक कौशल्याकडे आहे.

राष्ट्रवादी बरोबरची आघाडी ठरत होती अडचणीची

शिवसेनेची राष्ट्रवादीबरोबर झालेली आघाडी खरे तर या दोन्ही नेत्यांसाठी अडचणीची होती. या दोघांचा त्यांच्या मतदारसंघात थेट संघर्ष राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी आहे. सध्या शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे डॉ. अमोल कोल्हे खासदार आहेत, तर पुरंदर-हवेलीत काँग्रेसचे संजय जगताप आमदार आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीत शिवसेना राहिल्यास आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकीत आढळराव-पाटील आणि शिवतारे यांना थेट उमेदवारीसाठीच अडचण आली असती. अशीच अडचण जिल्ह्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघांत तेथील शिवसेनेच्या नेत्यांना येणार आहे.

जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसशी संघर्ष करीत आपली राजकीय कारकीर्द तयार केलेला प्रत्येक शिवसैनिक यामुळे अस्वस्थ होता. या अस्वस्थतेला आढळराव, शिवतारे यांनी शिंदे गटात जाऊन तोंड फोडले आहे.

Back to top button