खासदार श्रीरंंग बारणे एकनाथ शिंदे गटात | पुढारी

खासदार श्रीरंंग बारणे एकनाथ शिंदे गटात

पिंपरी : मावळचे खासदार श्रीरंग बारणे हे शिवसेनेत बंडखोरी करुन भाजपसोबत सरकार स्थापन केलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होणार असल्याचे ‘ पुढारी’ने दिलेले वृत्त खरे ठरले आहे. बारणे हे शिंदे गटात सामील झाले आहेत.
एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले.

शिंदे गटाबरोबर गेलेल्या शिवसेनेच्या 12 खासदारांनी शिवसेना गटनेते विनायक राऊत यांच्या जागी राहुल शेवाळे यांची गटनेतेपदी नियुक्ती केली आहे. त्याबाबतचे पत्र लोकसभा अध्यक्षांना दिले आहे. त्याला मावळचे खा. श्रीरंग बारणे यांनीही पाठिंबा दिला आहे. त्यामुळे बारणे शिंदे गटात दाखल झाल्याचे स्पष्ट झाले.

पिंपरी-चिंचवड, मावळ आणि पनवेल, उरण, खालापूर विधानसभा मतदारसंघाचा समावेश असलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघाचे खा. बारणे प्रतिनिधीत्व करतात. ते सलग दोनवेळा मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यांचे पुतणे निलेश बारणे शिवसेनेचे नगरसेवक होते.

त्यांचे पुत्र विश्वजीत बारणे शहर युवासेना अधिकारी आहेत. पिंपरीचे माजी आमदार गौतम चाबुकस्वार, आकुर्डीतील माजी नगरसेवक प्रमोद कुटे, महिला संघटिका उर्मिला काळभोर, माजी शहरप्रमुख योगेश बाबर हे खा. बारणे यांचे समर्थक आहेत. त्यामुळे बारणे शिंदे गटात गेल्याने शिवसेनेला मोठा धक्का मानला जात आहे.

खा. बारणेंनी म्हटले आहे की, ‘शिवसेना गटनेतेपदी राहुल शेवाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शेवाळे यांची सहकार्याची भूमिका असते. त्यामुळे मी त्यांना पाठिंबा दिला आहे. आम्ही सगळे शिवसेनेशी संलग्न आहोत’. आगामी लोकसभा निवडणुकीचा विचार करुन खा. बारणे यांनी भाजपसोबत युती केलेल्या शिवसेना बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणे पसंत केल्याची चर्चा आहे.

शिवसैनिक शिवसेनेबरोबरच
सामान्य शिवसैनिक शिवसेनेसोबतच असल्याचे माजी आमदार गौतम चाबुकस्वार यांनी ‘पुढारी’शी बोलताना सांगितले. आपण शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी असल्याचेही ते म्हणाले.

Back to top button