पिंपरी : शासकीय अर्जातील त्रुटी होणार दुरुस्त, मदतीचा रस्ता होणार खुला | पुढारी

पिंपरी : शासकीय अर्जातील त्रुटी होणार दुरुस्त, मदतीचा रस्ता होणार खुला

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : कोरोनाने मयत झालेल्या रुग्णाच्या नातेवाइकांना आठ महिने उलटूनही शासकीय मदत मिळाली नव्हती. म्हणून दैनिक पुढारीने मंगळवारी (दि. 12) रोजी ‘कोरोनाने मृत झालेल्यांच्या नातेवाइकांची परवड’ अशा मथळ्याची बातमी प्रसिद्ध केली. या बातमीची दखल घेऊन महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने आज बुधवार (दि. 20) रोजी अर्जातील त्रुटी दूर करण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान पिंपरी येथील डिलक्स चौकातील नवीन ‘जिजामाता रूग्णालयातील तिसर्‍या मजल्यावर बुधवारी स. 10 ते 2 वाजता नातेवाईकांनी बँक खाते पासबुक किंवा चेकची झेरॉक्स घेऊन येण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार पुन्हा अर्ज शासनाकडे पाठवून, आर्थिक मदत मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाच्या प्रादुर्भावाने मृत झालेल्या रूग्णांचा आकडा मोठा होता. महाराष्ट्र शासनाने कोरोनामुळे मयत झालेल्या रूग्णांच्या नातेवाईकांसाठी 50 हजार रूपयांचे आर्थिक सहाय्य देऊ केले होते. मात्र त्रुटीं व कागदपत्रांची पूर्तता नसल्याचे कारण देत,अर्ज प्रलंबित होते. शहरातून एकूण 7616 अर्ज शासनाकडे गेले होते. मात्र, यापैकी 715 रूग्णांच्या नातेवाईकांचे अर्ज मंजूर होऊन, त्यांना आर्थिक मदत मिळालेली आहे.

मात्र इतरांना कशामुळे आपल्याला मदत मिळाली नाही किंवा अर्जाची स्थिती काय? याबाबत नातेवाईक अनभिज्ञ होते. मात्र बातमीचा परिणाम होऊन महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या वतीने ज्या नातेवाईकांनी आर्थिक मदतीसाठी अर्ज केलेले आहेत. त्या सर्वांच्या संपर्क क्रमांकावर मेसेज करून, त्यांना कागदपत्रे घेऊन येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच अतिरिक्त माहितीसाठी 7843096206 या क्रमांकावर व्हाट्सअ‍ॅप किंवा मेसेज करण्याचे देखील सांगितले आहे.

Back to top button