पुणे : लाच मागणार्‍या कोतवालावर गुन्हा | पुढारी

पुणे : लाच मागणार्‍या कोतवालावर गुन्हा

पुणे, पुढारी वृत्तसेवा: तब्बल 20 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी वडकी तलाठी कार्यालयातील नामदेव बाबूराव शिंदे (वय 48) या कोतवालावर लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका 46 वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे.

तक्रारदार यांच्या मित्राची वडकी येथील गट क्रमांक 824, 840 मधील चार गुंठे जागेची सातबारा उतार्‍यावर नोंद घेण्यासाठी व पुढील कार्यवाहीसाठी सर्कल कार्यालयात पाठवण्यासाठी कोतवाल शिंदे याने 20 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याची तक्रार लाचलुचपत विभागाकडे आली होती.

दाखल तक्रारीची 27 ते 28 जून या कालावधीत पडताळणी केली असता, शिंदे याने स्वतःसाठी व वडकी तलाठी यांच्यासाठी तक्रारदारांकडे 20 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे समोर आले. त्यानुसार शिंदे याच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमानुसार लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपअधीक्षक सीमा आडनाईक करीत आहेत.

Back to top button