‘इंद्रायणी’ने घेतला मोकळा श्वास; मोशीतील नदीपात्र जलपर्णी मुक्त | पुढारी

‘इंद्रायणी’ने घेतला मोकळा श्वास; मोशीतील नदीपात्र जलपर्णी मुक्त

मोशी, पुढारी वृत्तसेवा: मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मोशी, डुडुळगाव भागातून वाहणारी इंद्रायणी नदी जलपर्णी मुक्त झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे स्वच्छ मोकळे नदीपात्र पाहण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत. गेल्या आठवडाभरापासून वरूनराजा धो-धो बरसत आहे. त्यामुळे नदी पुराच्या पाण्याने ओसंडून वाहत आहे. या पाण्याच्या वेगवान प्रवाहाचा जलपर्णी वाहून जाण्यास फायदा झाला आहे. मुळात जल प्रदूषण मोठ्या प्रमाणात फोफावते आहे. जवळपास सहा ते सात महिने प्रशासनाकडून जलपर्णी काढण्याचे काम सुरू असते. यासाठी कोट्यावधी रुपये खर्च होत असतो. मात्र, पूर्ण नदीपात्र जलपर्णीमुक्त होत नाही. यात भ्रष्टाचाराचे आरोप विरोधी पक्षाकडून होत असतात.

प्रशासनाच्या कामाचा लेखाजोखा जो असेल तो असेल पण निसर्ग मात्र दरवर्षी आपलं काम चोख बजावत असून, यंदाही त्याने पहिल्याच महिन्यात संपूर्ण नदीपात्र पुराच्या पाण्याने जलपर्णीमुक्त केले आहे. आता काही महिने नदी मोकळा श्वास घेईल; मग पुन्हा पाणी स्थिर व प्रदूषित दिसू लागेल आणि जलपर्णी अंकुर फुटायला सुरुवात होईल. त्यानंतर पुन्हा प्रशासन जलपर्णी काढण्याचे काम सुरू करतील. कायमस्वरूपी नदी पात्र स्वच्छ राहावे त्यासाठी आवश्यक त्या प्रदूषणमुक्तीच्या उपाययोजना कराव्यात, जलपर्णी, ओढ्यातून मिसळणारे प्रदूषित पाणी यावर केवळ दंडात्मक कारवाई न करता समूळ उच्चाटन आदी निर्णय घेतले जावेत, अशी मागणी सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत आहेत.

नदी खळाळून वाहू लागली
इंद्रायणी नदीतील जलपर्णी काढण्यासाठी पर्यावरणप्रेमी वारंवार आवाज उठवत असतात. मात्र, त्यावर तोडगा निघत नाही. मात्र, सध्या तरी इंद्रायणी नदीने मोकळा श्वास घेतला असून, उगमापासून ते संगमापर्यंत खळाळून वाहत असल्याचे सुंदर चित्र दिसून येत आहे.

Back to top button