पिंपरी : प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी गुरुवारी प्रसिद्ध होणार | पुढारी

पिंपरी : प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी गुरुवारी प्रसिद्ध होणार

पिंपरी, पुढारी वृत्तसेवा: पिंपरी-चिंचवड महापालिकेची प्रभागनिहाय अंतिम मतदार यादीसंदर्भातील कामकाज सोमवारी (दि.18) पूर्ण झाले आहे. ती यादी संगणक प्रणालीत अपडेट केली जाणार आहे. त्यानंतर गुरुवारी (दि. 21) प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे, असे सहायक आयुक्त बाळासाहेब खांडेकर यांनी सांगितले. महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या 1 ते 46 प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादीवर विक्रमी 8 हजार 147 हरकती पालिकेच्या निवडणूक विभागास प्राप्त झाल्या आहेत. मोठ्या संख्येने हरकती तसेच, जोरदार पावसामुळे कामकाजात अनेक अडचणी येत निर्माण झाल्या. त्या स्थितीत हरकतदारांच्या घरास प्रत्यक्ष भेट देऊन स्थळ पाहणी करून अर्जाची पडताळणी करण्यात आली.

चिंचवड व पिंपरी विधानसभा मतदार संघातील हरकतींचा निपटारा सुरुवातीला झाला. भोसरी विधानसभा मतदार संघातील प्रारूप मतदार यादीच्या हरकतींचे कामकाज आज पूर्ण झाले. राज्य निवडणूक आयोगाच्या संगणक प्रणालीवर प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी अपडेट केली जाणार आहे. गुरुवारी महापालिकेच्या संकेतस्थळावर तसेच, पालिका भवन आणि सर्व क्षेत्रीय कार्यालयात अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल, असे खांडेकर यांनी स्पष्ट केले. दरम्यान, हरकतींवर काम पूर्ण करून अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यासाठी प्रथम 16 जुलै, त्यानंतर 21 जुलै अशी मुदतवाढ देण्यात आली होती.

Back to top button