लोणावळा शहरात एकेरी वाहतूक; नित्याची वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांचा निर्णय | पुढारी

लोणावळा शहरात एकेरी वाहतूक; नित्याची वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांचा निर्णय

लोणावळा, पुढारी वृत्तसेवा: लोणावळा शहरातील बाजारपेठ भागात सातत्याने होणार्‍या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर शहरात सोमवार (दि.18) जुलैपासून एकेरी वाहतुकीची अंमलबजावणी करण्याचा निर्णय पोलिस दलाने घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन लोणावळ्याचे पोलिस निरीक्षक सीताराम डुबल यांनी केले आहे. वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस जटील बनत चालला आहे. पूर्वी केवळ विकेंडला तसेच आठवडे बाजाराच्या दिवशी वाहतूक कोंडी होत असे; परंतु आता आठवड्यातील सातही दिवस लोणावळेवासीयांना या समस्येचा सामना करावा लागतो आहे.

काही वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते भांगरवाडी इंद्रायणी पुल दरम्यान एकेरी वाहतुकीचा प्रयोग यशस्वीपणाने राबविण्यात आला होता. कोरोना काळात व त्यानंतर पंडित नेहरु रोडचे काम यामुळे ही एकेरी वाहतूक बंद करण्यात आली होती. सोमवारपासून मात्र पुन्हा एकेरी वाहतूक सुरु करण्यात येणार आहे. नवीन बदलानुसार भांगरवाडी बाजूला जाणारी वाहने छत्रपती शिवाजी महाराज चौकातून दीपक हॉटेल, नगर परिषद हॉस्पिटल, इंद्रायणी पूल या मार्गे जातील, तर भांगरवाडी येथून बाजारपेठेकडे येणारी वाहतूक मारुती मंदिर इंद्रायणी पूल, पुरंदरे हायस्कूल, संजीवनी हॉस्पिटल, पोलीस स्टेशन मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकात येतील.

या दोन्ही मार्गावरील दुकानदार व नागरिकांनी त्यांची वाहने रस्त्यावर उभी करू नयेत. प्रवासी वाहनांना जाण्यासाठी रस्ते मोकळे ठेवावेत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक तसेच इंद्रायणी पूल येथे पोलिस व वॉर्डन तैनात करण्यात येणार आहेत; तसेच एकेरी वाहतुकीची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिस निरीक्षक व इतर अधिकारी, कर्मचारी देखील तैनात असणार आहेत.

नागरिकांच्या मागणीनुसार हा बदल
नागरिकांच्या सोयीसाठी व सर्वांच्या मागणीनुसार एकेरी वाहतूक व्यवस्थेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यामुळेच वाहनचालकांनी विविध कारणे न देता नेमून दिल्याने मार्गाने प्रवास करावा व वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सहकार्य करावे, पोलिस कर्मचारी अथवा वॉर्डन यांच्याशी हुज्जत घालू नये. नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर दंडात्मक कारवाईदेखील केली जाईल, असा इशारा पोलिस निरीक्षक सीताराम डुबल यांनी दिला आहे.

Back to top button