पुणे : भोरमधील पर्यटनस्थळांवर गर्दी | पुढारी

पुणे : भोरमधील पर्यटनस्थळांवर गर्दी

भोर, पुढारी वृत्तसेवा : रोहिडेश्वर, रायरेश्वर, निरा देवघर, भाटघर, वरंध या भोर तालुक्यातील पर्यटनस्थळांवर पर्यटकांनी रविवारी
(दि. 17) गर्दी केली होती. अतिवृष्टीमुळे शासनाने पर्यटनस्थळांवर जाण्यास बंदी घातली असतानाही त्याचे सर्रास उल्लंघन झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले.

मागील पंधरा दिवसांपासून तालुक्यात अतिवृष्टी सुरू आहे. यामुळे वरंध घाटमाथ्यावरील रस्त्यावर दरडी तसेच झाडे कोसळत आहेत. याची दखल घेऊन प्रशासनाने रोहिडेश्वर, रायरेश्वर, निरा देवघर, भाटघर, वरंध घाट परिसरात पर्यटनाला बंदी घातली आहे. मात्र, त्यास न जुमानता पर्यटक गर्दी करीत आहेत.

यंदा जोरदार पावसाने घाट परिसरात दरडी कोसळणे व मोठमोठी झाडे कोसळण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे भोर प्रशासनाने पर्यटनाला बंदी घालून निगुडघर येथे चेक पोस्ट उभारले आहे. मात्र, पर्यटक चेक पोस्टवरील कर्मचार्‍यांना गुंगारा देत घाटरस्त्यावर जात आहेत. त्यांच्यावर कारवाईची मागणी होत आहे.

भोर-महाड मार्गावरील वरंध घाटात पाऊस सुरू झाल्यापासून दरडी कोसळण्याचे प्रकार सुरू आहेत. यामुळे प्रशासनाकडून जड वाहनांना व पर्यटकांना बंदी घातली आहे. तरीही, काही पर्यटक निगुडघर येथील चेक पोस्टवरून शासकीय कर्मचार्‍यांना गुंगारा देत पर्यटनासाठी घाटात जात आहेत. त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे तहसीलदार सचिन पाटील यांनी सांगितले.

Back to top button